अधिक मासानिमित्त भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2023 04:25 PM2023-07-18T16:25:06+5:302023-07-18T16:26:26+5:30
भगवान पुरुषोत्तमाची जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याहस्ते महापूजा करण्यात आली
माजलगाव : तीर्थक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे मंगळवारी अधिक मास प्रारंभ निमित्ताने भगवान पुरुषोत्तमाची विधीवत महापूजा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्याहस्ते करण्यात आली.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक सुरेश साबळे, तहसीलदार वर्षा मनाळे यांचीही उपस्थिती होती.
दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास ( धोंड्याचा महिना) मंगळवार पासुन सुर झाला आहे.या महिनाभरात पुरुषोत्तमपुरी येथे भगवान विष्णूचा अवतार पुरुषोत्तम दर्शनासाठी महत्त्व आहे. भारतात एकमेव असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तमाचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून लाखो भाविक या महिन्याभरात या ठिकाणी गर्दी करतात.
मंगळवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांच्या हस्ते अभिषेक व विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी मुधोळ यांच्यासह शल्यचिकित्सक सुरेश साबळे ,तहसीलदार वर्षा मनाळे यांचा सत्कार समितीचे वतीने अध्यक्ष विजय गोळेकर,उपाध्यक्ष दिगंबर कोरडे,बाबासाहेब गोळेकर,माजी सरपंच भाऊसाहेब गोळेकर व ग्रामस्थांनी केला.दरम्यान अधिक मासाच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. दर्शन बारीमध्ये रांगा लावून दर्शन घेतले. मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यातील महिला भाविकांची संख्या मोठी दिसून आली.जवळपास २० हजार भाविकांनी दर्शन घेतले. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याने प्रशासन व मंदिर ट्रस्ट यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पहावयास मिळाले.