हे एक राजकीय षडयंत्र, इनामी जमिनी माझ्या किंवा कुटुंबियांच्या नावे नाहीत: सुरेश धस
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 11:55 AM2022-12-01T11:55:15+5:302022-12-01T11:55:41+5:30
आष्टी येथील आठ देवस्थान इनाम जमीन घोटाळ्याचे प्रकरण मागील काही दिवसांपासून गाजत आहे.
- नितीन कांबळे
कडा ( बीड) - तालुक्यातील देवस्थान इनामी जमीन प्रकरणी नुकताच आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी व भावावर आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याप्रकरणी आता आ. धस यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे. देवस्थान इनामी जमीन माझा किंवा माझ्या कुटुंबाच्या नावावर नाहीत. हे एक राजकीय षडयंत्र आहे, असा आरोप यावेळी आ. धस यांनी केला.
आष्टी येथील आठ देवस्थान इनाम जमीन घोटाळ्याचे प्रकरण मागील काही दिवसांपासून गाजत आहे. याप्रकरणी बुधवारी आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी व भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत विविध राजकीय चर्चा सुरु असताना आज सकाळी आ. धस यांनी आष्टी येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
ते म्हणाले की, देवस्थानच्या इनामी जमिनी माझ्या किंवा माझ्या कुटुंबाच्या नावावर नाहीत. सर्व आरोप निराधार आहेत. मी ज्या ट्रस्टवर आहे त्याबाबतच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. मी जुन्या पक्षात काम करत होतो, त्यातील राज्य व जिल्हास्तरावरील लोकांचे हे राजकीय षडयंत्र आहे. पोलिसांच्या चौकशीला मी तयार असून संपूर्ण सहकार्य करणार आहे. लवकरच 'दुध का दुध और पाणी का पाणी' होईल. लोकसेवका विरोधात तक्रार आल्यानंतर गुन्हे दाखल करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी आवश्यक असते. याप्रकरणात तशी परवानगी अद्याप घेतली गेली नाही. जर असेच घडत राहिले तर कोणत्याही लोकसेवकाविरोधात याचा अस्त्र म्हणून वापर होईल असेही आ. धस यावेळी म्हणाले.