बसस्थानक पडले ओस,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:33 AM2021-04-21T04:33:40+5:302021-04-21T04:33:40+5:30
अंबाजोगाई : संचारबंदीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी धावत आहेत. मात्र, बसस्थानकात प्रवासीच ...
अंबाजोगाई : संचारबंदीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस फक्त अत्यावश्यक सेवेसाठी धावत आहेत. मात्र, बसस्थानकात प्रवासीच येत नसल्याने बसस्थानक ओस पडले आहे. गेल्या पाच दिवसांपासून एकही बस अंबाजोगाईच्या बसस्थानकातून सुटली नाही. इतर वेळी फक्त अंबाजोगाई आगाराच्या १७६ फेऱ्या होतात. मात्र, आता एकही बस सुटत नसल्याने बसस्थानक ओस पडले आहे.
अंबाजोगाईचे बसस्थानक हे मध्यवर्ती बसस्थानक म्हणून प्रसिद्ध आहे. लांब पल्ल्याच्या मोठ्या प्रमाणात गाड्या अंबाजोगाईतून जातात. दिवसभरात किमान ३०० पेक्षा जास्त बस अंबाजोगाईच्या बसस्थानकात येतात. तर अंबाजोगाईच्या बसस्थानकातून अंबाजोगाई आगाराच्या १७६ फेऱ्या येणे व जाणे दररोज होत होत्या. मात्र, बीड जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. त्यातच अंबाजोगाई तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. शासनाने कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केले. प्रारंभीच्या काळात बीड जिल्ह्यात १० दिवसांचे लॉकडाऊन झाले. त्या काळात तर बससेवा बंद राहिली. पुन्हा ६ एप्रिलपासून महाराष्ट्र शासनाचे लॉकडाऊन सुरू झाले. या लॉकडाऊनमध्ये बससेवेला परवानगी देण्यात आली. मात्र, ही परवानगी अत्यावश्यक सेवेसाठीच लागू आहे. इतर प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. असा नियम शासनाच्या वतीने लागू करण्यात आला आहे. परिणामी प्रवासी बसस्थानकाकडे फिरकलेच नाहीत. अत्यावश्यक सेवेसाठी असणारे कर्मचारी स्वत:च्या वाहनाने प्रवास करू लागल्याने गेल्या पाच दिवसांपासून अंबाजोगाई बसस्थानकातून एकही बस स्थानकातून हलली नाही. परिणामी अंबाजोगाईचे बसस्थानक ओस पडले आहे.
अंबाजोगाई आगाराच्या व्हायच्या १७६ फेऱ्या
लॉकडाऊनच्या पूर्वी बससेवा सुरळीत असताना अंबाजोगाईच्या आगारातून १७६ बसफेऱ्या दूरच्या व लांब पल्ल्याच्या होत होत्या. मात्र, आता कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालल्याने प्रवास करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यातच शासनाने अत्यावश्यक सेवेला बसप्रवासासाठी परवानगी दिल्याने सामान्य नागरिक इकडे फिरकायलाही तयार नाहीत.
उत्पन्नाला मोठा फटका
गेल्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लावण्यात आल्यापासून गेल्या वर्षभरात अंबाजोगाई आगाराच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आर्थिक घडी बसत होती. मात्र, पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला व महामंडळाच्या उत्पन्नाला मोठा फटका बसला. - नवनाथ चौरे, आगारप्रमुख, अंबाजोगाई
===Photopath===
200421\avinash mudegaonkar_img-20210420-wa0068_14.jpg