बियाणांची चढ्या भावात विक्री, उपाययोजना करण्यासाठी धनंजय मुंडेंचे कृषीमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 05:12 PM2023-06-15T17:12:32+5:302023-06-15T17:13:03+5:30
राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे यांची कृषी मंत्र्यांना पत्रातून मागणी
परळी: खरीप हंगामाच्या तोंडावर मराठवाड्यात काही क्षेत्रात पाऊस झाला तर काही क्षेत्रांमध्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. परंतु, शेतकरी वर्गात सोयाबीन कपाशी यासह विविध बियाणे खरेदी करण्याबाबत लगबग सुरू आहे. याचाच फायदा घेऊन अनेक प्रकारचे बोगस बियाणे राज्यभरात बाजारात आणून प्रसिद्ध ब्रँडची नावे वापरून, चढ्या भावाने विक्री केली जात आहेत. शेतकऱ्यांची संभाव्य फसवणूक टाळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने यावर तात्काळ उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे कृषिमंत्र्यांकडे केली आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
एक जून रोजीच्या सुमारास बुलढाणा जिल्ह्यातील चिखली एमआयडीसी परिसरात छत्रपती संभाजीनगर येथील एका नामांकित कंपनीच्या नावाचे बोगस बियाणे कृषी विभागाने जप्त केले होते; त्यांची किंमत दोन कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जाते. याच प्रकारचे बोगस बियाण्यांचे रॅकेट राज्यभरात सर्वत्र सक्रिय झालेले आहेत, याद्वारे राज्यातील शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होऊ शकते, मात्र या रॅकेटचा संपूर्ण बंदोबस्त करून यावर नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला अद्याप यश आले नाही; असे धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
ऐन पेरणीच्या तोंडावर विशेषतः सोयाबीन व कपाशी सारख्या जास्त मागणी असलेल्या बियाण्यांच्या वितरण प्रणाली मध्ये बोगस बियाण्यांचा राज्यभरात सुळसुळाट झाला आहे. प्रसिद्ध ब्रँड्सची नावे वापरून चढ्या भावाने बोगस बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. काही ठिकाणी धाडसत्रात… pic.twitter.com/bAQZkD1e0m
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) June 15, 2023
कपाशीच्या बाबतीत कबड्डी नावाचा वाण लोकप्रिय आहे, कबड्डीच्या एका बॅगची किंमत 850 रुपयांच्या आसपास आहे, मात्र हे बियाणे दोन हजार रुपयांपेक्षा अधिक भावाने विक्री केले जात असल्याच्या तक्रारी अनेक शेतकऱ्यांनी केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांनी भावावरून दुकानदारास विचारणा केल्यास दुकानदार सरळ सदर बियाणे संपले आहे, असे सांगून मोकळे होतात अशा पद्धतीने चढ्या भावाने विक्री व साठेबाजी केली जात असल्याचीही धनंजय मुंडे यांनी माहिती दिली आहे. सोयाबीनच्या महाबीज 71 या वाणाच्या बाबतीतही तशीच परिस्थिती आहे.
आधीच शेकडो संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांची ऐन खरिपाच्या तोंडावर फसवणूक होऊ नये, यासाठी शासनाने कृषी निविष्ठा दुकानांवर करडी नजर ठेवण्यासाठी अधिकची विशेष पथके नेमावीत, तसेच आवश्यक सर्व उपाययोजना, धाडी व धडक कारवाया करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवावे, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.