धनंजय मुंडेंवर साधला निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 12:13 AM2019-07-12T00:13:02+5:302019-07-12T00:14:34+5:30
जो माणूस भावनाशून्य राजकारण करतो, गोरगरिबांच्या जमिनी लाटतो, त्याला कोणत्याही पदांवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला.
परळी : जो माणूस भावनाशून्य राजकारण करतो, गोरगरिबांच्या जमिनी लाटतो, त्याला कोणत्याही पदांवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशा शब्दांत ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता खरपूस समाचार घेतला. माझी लढाई कोण्या विशिष्ट व्यक्तीविरूध्द नाही तर प्रवृत्ती विरूध्द आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात ज्यांनी ज्यांनी जातीपातीचे राजकारण केले, ते आज नेस्तनाबूत झाले आहेत. त्यामुळे अशा राजकारणाला थारा देऊ नका, विकास हीच जात मी मानते, त्यामुळेच कोट्यवधी रु पयांचा निधी जिल्हयात आणू शकले. भविष्यात विकासाच्याच मागे उभे रहा, असे सांगत त्यांनी समाजातील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार असल्याचे सांगितले.
मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिल्याबद्दल मतदारसंघातील मराठा समाज बांधवांनी पंकजा मुंडे यांचा ऋणनिर्देश सोहळा आयोजित केला होता. सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आ. आर. टी. देशमुख होते. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मराठा समाजाची आरक्षणाची लढाई गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती, काँग्रेस -राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात प्रमुख पदांवर समाजाचे नेते विराजमान होते, समाजाच्या जिवावर त्यांनी अनेक राजकीय पदं उपभोगली परंतु त्यांच्या मागणीकडे मात्र साफ दुर्लक्ष केले, म्हणूनच समाजाची पिछेहाट झाली व इतके वर्षे आरक्षणासाठी संघर्ष करावा लागला. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ही मागणी संवेदनशीलपणे हाताळली नसल्याने सनदशीर मार्गाने समाजाने आंदोलन केले, त्यांची ही मागणी मान्य करत भाजप सरकारने कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळवून दिले आणि त्यांना खरा न्याय मिळाला, असे त्या म्हणाल्या.
मी कोणत्याही पदांच्या लालसेने राजकारणात आले नाही. तुम्हाला आज योग्य दिशा व विकास देणारा माणूस हवा आहे, अशा माणसांच्याच पाठीशी खंबीरपणे उभा राहा असे सांगून मराठा समाजाला आपण परळी येथे झालेल्या आंदोलनाच्या वेळी जो शब्द दिला होता, तो पूर्ण केला असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी आ. देशमुख, सचिन सोळंके यांनीही मनोगत मांडताना पंकजा मुंडे यांचे आभार मानले. याप्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष नेताजी देशमुख, वृक्षराज निर्मळ, नारायण सातपुते, दत्ता देशमुख, बालासाहेब कराळे, सुरेश माने, प्रल्हाद सुरवसे, भाऊसाहेब घोडके, जीवनराव कीर्दत, विलास जगताप, संजय गिराम, शामराव आपेट, बाबा शिंदे, प्रभाकर कदम, भरत सोनवणे, मोहनराव आचार्य, आश्रुबा काळे, धनंजय कराळे, पंडितराव मुठाळ, आबासाहेब मोकाशे, रमेश पाटील आदींसह मराठा बांधव उपस्थित होते.