धनंजय मुंडेंनी गाळला घाम; वॉटरकप स्पर्धेसाठी परळीत केले 3 तास श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 05:01 PM2018-04-26T17:01:14+5:302018-04-26T17:15:05+5:30
नेहमी आपल्या आक्रमक आणि तडाखेबाज भाषणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज तीन तास श्रमदान करत चांगलाच घाम गाळला.
परळी (बीड ) : नेहमी आपल्या आक्रमक आणि तडाखेबाज भाषणासाठी प्रसिद्ध असणाऱ्या विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज तीन तास श्रमदान करत चांगलाच घाम गाळला. वॉटरकप स्पर्धेत सहभागी झालेल्या तालुक्यातील 3 गावात मुंडे यांनी हे श्रमदान करत तेथील ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले.
आज सकाळीच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे रेवली गावात पोहोचले. यावेळी नेहमी नेहरू शर्ट आणि पायजम्यात दिसणारे मुंडे अंगात टी-शर्ट आणि स्पोर्ट पॅन्ट अशा वेगळ्या पेहरावात होते. काम सुरु असलेल्या जागी जात त्यांनी गावकऱ्याकडून तेथील कामाची माहिती घेतली आणि थेट हातात कुदळ घेऊन कामाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या मलनाथपुर, परचुंडी या गावी जात इथेही श्रमदान करत ग्रामस्थांना प्रोत्साहन दिले. यासोबतच मुंडे यांचे वेगळे रूप यानिमित्ताने ग्रामस्थांनी अनुभवले.
यावेळी जि. प. सदस्य अजय मुंडे, परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिकअण्णा कराड, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान मुंडे, शिक्षण सभापती गोपाळ आंधळे, माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण तात्या पौळ, बाजार समितीचे संचालक राजाभाऊ पौळ, माऊली तात्या गडदे, प.स. माजी उपसभापती विष्णुपंत देशमुख, प.स. सदस्य वसंत तिडके, पाणी पुरवठा सभापती भाऊड्या कराड, नितीन कुलकर्णी , चंद्रकांत कराड, शहर सरचिटणीस बळीराम नागरगोजे, जयदत्त नरवटे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने या श्रमदानात सहभागी होते.