वैद्यनाथांचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात; मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह हजारो भाविक लीन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 12:26 PM2024-01-01T12:26:21+5:302024-01-01T12:39:45+5:30
भाविकांनी दर्शनासाठी परळीतील वैद्यनाथ मंदिरात गर्दी केली आहे
परळी: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली आहे. हर हर महादेव, प्रभू वैद्यनाथ भगवान की जय, असा जयघोष करीत सकाळी दहापर्यंत हजारो शिवभक्तांनी श्री प्रभू वैद्यनाथांचे दर्शन घेतले. बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील आज वैद्यनाथांचे दर्शन घेऊन नवीन वर्षास सुरुवात केली.
नवीन वर्षांची सुरुवात भक्तीभावात धार्मिक पर्यटनकरून करण्याकडे अनेक भाविकांचा कल वाढला आहे. भाविक सकाळपासूनच आज परळीत दाखल झाले असून वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरात वर्दळ वाढली आहे. राज्यभरासह संपूर्ण देशातून हजारो भाविक यावेळी मोठ्या भक्तीभावात वैद्यनाथाचे दर्शन घेत होते.
कष्टकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी यावी
दरम्यान, राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील आज पहाटे नवीन वर्षाची सुरुवात प्रभू वैद्यनाथाच्या चरणी विधिवत रुद्राभिषेक करून दर्शनाने केली. यावेळी त्यांनी २०२४ हे नवीन वर्ष राज्यातील शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणणारे ठरावे, कृषकांची सेवा करण्याचे आपल्याला बळ मिळावे, अशी प्रार्थना यावेळी केली.
येथे वातावरण भक्तिमय
आम्ही पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथून परळी येथे महादेवाच्या दर्शनासाठी नवीन वर्षात आलो. देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. दर्शन घेऊन मन प्रसन्न झाले. येथील वातावरण फार भक्तिमय आहे.
- वैशाली देवडा ( छत्रपती संभाजी नगर) आणि मदन दर्डा ( शिरूर जिल्हा पुणे)