थेट नेपाळमधून धनुभाऊंना फोन, आजारपणातही कर्तव्यदक्षता; बीडमधील ८ तरुणांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 09:56 PM2023-01-31T21:56:50+5:302023-01-31T21:59:27+5:30

घाबरलेले आठही तरुण रडत पडत जवळच्या पोलीस ठाण्यात गेले, मात्र, तिथेही त्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही.

Dhananjay munde calls from Nepal, 8 youths from Beed rescued in nepal; Conscientiousness even in sickness | थेट नेपाळमधून धनुभाऊंना फोन, आजारपणातही कर्तव्यदक्षता; बीडमधील ८ तरुणांची सुटका

थेट नेपाळमधून धनुभाऊंना फोन, आजारपणातही कर्तव्यदक्षता; बीडमधील ८ तरुणांची सुटका

googlenewsNext

परळी - बीड जिल्ह्यातील केज तालुक्याच्या शिरूर घाट येथील दीपक सांगळे याच्यासह त्याचे सात मित्र असे एकूण आठ तरुण नेपाळमध्ये फिरायला गेले असता लुटमार झाल्याने अडकले होते, मात्र, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या तातडीच्या प्रयत्नांमुळे त्यांची सुटका झाली असून ते सुखरूप आहेत व लवकरच आपापल्या घरी पोहोचतील.

शिरूर घाट ता. केज येथील दीपक जीवन सांगळे याच्यासह महेश हरकर, विश्वजीत घुले, किरण चव्हाण, आकाश खामकर, अक्षय पारेकर, अविष्कार मुळीक व सुरज लोंढे हे आठ तरुण फिरायला नेपाळमध्ये गेले होते. दरम्यान सोमवारी रात्री काठमांडू शहरातील तामिल परिसरात फिरत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील सर्व पैसे तसेच त्यांच्या अकाउंटवरील पैसे सुद्धा जबरदस्तीने ऑनलाइन घेतले व त्यांना मारहाण करून सोडून दिले. 

घाबरलेले आठही तरुण रडत पडत जवळच्या पोलीस ठाण्यात गेले, मात्र, तिथेही त्यांना अपेक्षित मदत मिळाली नाही. तेव्हा त्यांनी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांना पोलीस ठाण्यातील वायफाय वापरून व्हाट्सअप कॉल केला व रडत मदतीची याचना केली. धनंजय मुंडे यांनी संबंधित तरुणांना धीर दिला तसेच तात्काळ मदतीचे आश्वासन दिले. त्यानंतर अपघात ग्रस्त असूनही धनंजय मुंडे यांनी एक ट्विट करत परराष्ट्र मंत्री डॉ. जय शंकर, नेपाळमधील भारतीय दूतावास, नेपाळ पोलीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित दादा पवार आदींना याबाबत माहिती दिली. तसेच फोनवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांच्या कार्यालयासही सदर तरुणांना मदत करण्याबाबत विनंती केली. 

बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनाही याबाबत माहिती देत मुलांच्या सुटकेसाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर काही क्षणातच यंत्रणा कामाला लागल्या. नेपाळमधील भारतीय दूतावास व गृह विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थेट संबंधित पोलीस ठाणे गाठून तरुणांशी संपर्क साधला व त्या तरुणांच्या जीवात जीव आला.

दरम्यान त्या तरुणांची लूट करणाऱ्या दोन चोरट्यांना देखील नेपाळ पोलिसानी अटक केली असून, सर्व 8 तरुण सध्या सुखरूप आहेत व भारतीय शासकीय यंत्रणेमार्फत त्यांची तामील (काठमांडू) येथील अग्रवाल भवन येथे राहणे व अन्य व्यवस्था करण्यात आली आहे. संबंधित तरुणांना परत येण्यासाठी तिकिटासह सर्व व्यवस्था करण्यात येत असुन लवकरच ते सर्वजण भारतात आपापल्या घरी सुखरूप पोचतील. 

सर्वच तरुणांनी मानले धनुभाऊंचे आभार

दरम्यान, दीपक व अन्य तरुणांशी संपर्क साधला असता, अडचणीच्या काळात रडत असताना धनंजय मुंडे  हे नेहमी बाहेर अडकलेल्या लोकांना मदत करतात, याबाबत अनेकदा ऐकले होते, हे लक्षात आले व त्यामुळे त्यांना फोन केला. त्यानंतर काही मिनिटांतच आम्हाला मदत मिळाली व आम्ही सध्या सुखरूप आहोत. आमचे काय होईल, असा प्रश्न समोर येऊन आम्ही रडत होतो मात्र मुंडे  धावून आले व त्यांच्या मुळे आम्ही आता सुखरूप घरी पोचू शकू, त्यासाठी धनंजय मुंडे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार  तसेच भारतीय दूतावास व इतर सर्व अधिकारी यांनी जी मदत केली, ती आम्ही कधीच विसरणार नाही, अशा शब्दात त्या तरुणांनी आपल्या भावना व्यक्त करत, आभार मानले आहेत.
 

Web Title: Dhananjay munde calls from Nepal, 8 youths from Beed rescued in nepal; Conscientiousness even in sickness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.