Anil Deshmukh Arrest: “अनिल देशमुखांवरील आरोप खोटे, सरकार अस्थिर करण्यासाठी चौकशा लावल्या जातायत”
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 10:38 PM2021-11-02T22:38:51+5:302021-11-02T22:39:38+5:30
Anil Deshmukh Arrest: अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खोटे असून, सरकार अस्थिर करण्यासाठी चौकशा लावल्या जात आहेत, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला आहे.
बीड: १०० कोटींच्या वसुली प्रकरणी आरोप असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Arrest) यांना तब्बल १३ तासांच्या दीर्घ चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) सोमवारी रात्री उशिरा अखेर अटक करण्यात आली. यानंतर राजकीय वर्तुळातून यावर प्रतिक्रिया उमटल्या असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचे पाहायला मिळाले. यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी अनिल देशमुख अटक प्रकरणी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खोटे असून, सरकार अस्थिर करण्यासाठी चौकशा लावल्या जात आहेत, असा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्र्यांवर भाजपकडून टीका केली जात आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी भाजपवर पलटवार केला आहे. परळी येथे पत्रकारांशी संवाद साधताना मुंडे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
अनिल देशमुखांवर झालेले आरोप खोटे
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेले आरोप खोटे असल्याचा दावा करत सरकार अस्थिर करण्यासाठी चौकशा लावल्या जात आहेत. आणि चौकशीला सामोरं गेलं नाही तर मात्र अटक करायचे, भाजपकडून राजकारण करण्यात येत आहे. तसेच भाजपने कितीही प्रयत्न केला तरी महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे. तसेच कोणत्याही चौकशीला अजितदादा सामोरे जाणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
अनिल देशमुखांना अटक होणे हेच दुर्दैवी
अनिल देशमुख चौकशी यंत्रणेला सहकार्य करत असताना त्यांना अटक होणं हेच मुळात दुर्दैवी आहे, असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. आरोप करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घ्यावा. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग बेपत्ता आहेत, ते जर परदेशात गेले असतील तर त्यांना कुणाची साथ आहे, अशी विचारणाही रोहित पवार यांनी यावेळी केली.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा न मिळाल्याने ते ED समोर हजर झाले. अनिल देशमुख यांची मुंबईतील कार्यालयात चौकशी सुरू असताना दिल्लीतून काही अधिकारी सायंकाळी मुंबईत दाखल झाले आणि ते थेट ईडीच्या कार्यालयात गेले. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली.