APMC Election: परळीत धनंजय मुंडेंचे वर्चस्व; पंकजा मुंडेंच्या पॅनलचे खातेही नाही उघडले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 04:42 PM2023-04-29T16:42:39+5:302023-04-29T16:43:22+5:30
भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते शेतकरी विकास पॅनल उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला.
परळी ( बीड): कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलने सर्व जागा जिंकत भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडवला. वैद्यनाथ पॅनलने सर्व 18 जागा जिंकल्या.
भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते शेतकरी विकास पॅनल उमेदवारांना दारुण पराभव पत्करावा लागला. भाजपा पॅनलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. 28 एप्रिल रोजी बाजार समितीच्या संचालक पदाच्या 18 जागेसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज येथील तहसिल कार्यालयात सकाळी सुरू करण्यात आली. मतमोजणी प्रक्रिया संथ गतीने सुरू होत असल्याने अंतिम निकालाला काही तास विलंब झाला.
परळीची कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या बारा वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आहे. पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांचे शनिवारी लागलेल्या निकालावरून बाजार समितीवर वर्चस्व निर्माण झाले आहे. भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते शेतकरी विकास पॅनलला सर्वच जागेवर पराभव पत्करावा लागला. आमदार धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलने भाजपच्या पॅनलचा धुव्वा उडविला आहे.
हे उमेदवार झाले विजयी
धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार अशोक भानुदास डिघोळे, प्रभाकर आबाजी दहिफळे, दत्तात्रय त्रिंबकराव देशमुख, भाऊसाहेब वामनराव नायबळ, राजाभाऊ पौळ, लक्ष्मण पौळ, रणजित विष्णुपंत सोळंके, भाग्यश्री संजय जाधव, कमलाबाई फुलचंद फड, सूर्यभान मुंडे, बळीराम कस्तुरे, राजाभाऊ गिराम, भगवानराव फड, राजाभाऊ जगताप, माऊली गडदे, सुरेश मदनराव मुंडे, जयपाल लाहोटी आणि सुग्रीव गित्ते.