धनंजय मुंडेंनी भाचीच्या लग्नात धरला ठेका, 'अपनी तो जैसे तैसे' गाण्यावर थिरकताना दिसले धनुभाऊ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 05:03 PM2022-02-08T17:03:12+5:302022-02-08T17:04:01+5:30
तीन दिवसांपूर्वी पार पडलेल्या विवाहसोहळ्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे राजकीय वैर विसरुन एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. इतरवेळी एकमेकांवर आरोप करणारे बहिण-भाऊ यावेळी राजकारण विसरुन मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले.
बीड: राज्याचे सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा लग्नामध्ये झिंगाट डान्स करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये धनुभाऊचा दिलखुलास अंदाज पाहायला मिळत आहे. यात धनुभाऊंचा दिलखुलास अंदाज एका लग्नात पाहायला मिळाला आहे. 'अपनी तो जैसे तैसे' गाण्यावर नवरदेव आणि नवरीसोबत धनंजय मुंडे थिरकले आहेत.
इतरवेळी नेत्यांना विविध मुद्द्यांवरुन आक्रमक होताना किंवा गंभीर मुद्रेत आपण पाहत असतो. पण, काहीवेळा हेच नेतेमंडळी सार्वजनिक आयुष्य विसरुन खासगी आयुष्य मनसोक्त जगताना दिसतात. यात धनंजय मुंडेदेखील मागे नाहीत. नुकताच धनंजय मुंडे यांच्या भाचीचा लातूरमध्ये मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. यावेळी एक वेगळेच धनंजय मुंडे लोकांना पाहायला मिळाले.
धनंजय मुंडेंनी भाचीच्या लग्नात धरला ठेका, 'अपनी तो जैसे तैसे' गाण्यावर थिरकताना दिसले धनुभाऊ#dhananajaymundepic.twitter.com/pZbYOw9CTA
— Lokmat (@lokmat) February 8, 2022
लातूरमध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांची भाची तेजश्री वामनराव केंद्रेंच्या लग्नासाठी धनंजय मुंडे सकाळपासूनच उपस्थित होते. हॉटेल कार्निवलमध्ये झालेल्या विवाहसोहळ्यात तेजश्री केंद्रे आणि शरद सोनहीवरे लग्नाच्या बेडीत अडकले. दुपारनंतर या विवाह सोहळ्याला पंकजा मुंडे यांनी त्यांच्या आईंसोबत हजेरी लावली होती. दरम्यान याच विवाहसोहळ्यात धनंजय मुंडे यांनी वधू आणि वरासबोत एका गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले.
पंकजा मुंडेंसोबत गप्पा
तीन दिवसांपूर्वी पार पडलेल्या या विवाहसोहळ्यात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे राजकीय वैर विसरुन एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. इतरवेळी एकमेकांवर आरोप करणारे बहिण-भाऊ यावेळी राजकारण विसरुन मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले. याआधीही धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे अनेकदा काही कार्यक्रमांच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. पण, इतकावेळी त्यांनी सोबत घालवल्याचे मागील काही वर्षांमध्ये पाहण्यात आले नाही. भाचीच्या लग्नामध्ये बहिण-भावाने गप्पा तर मारल्याच, पण एकत्र बसून जेवणदेखील केले.