मोठी बातमी! मुंडे भाऊ-बहिण वैद्यनाथ कारखान्यासाठी एकत्र; सर्व २१ संचालक बिनविरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2023 06:11 PM2023-06-01T18:11:17+5:302023-06-01T18:12:05+5:30
विशेष म्हणजे, संचालक मंडळासाठी तिन्ही मुंडे बहिणींनी अर्ज केला होता. तर धनंजय मुंडे यांनी अर्ज भरला नव्हता.
- संजय खाकरे
परळी: लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी स्थापन केलेल्या परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणूक बिनविरोध झाली. या निवडणुकीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या माजी चेअरमन भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा गोपीनाथराव मुंडे आणि राष्ट्रवादीचे माजीमंत्री धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ एकत्र आले. यामुळे २१ सदस्यांचे संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले. विशेष म्हणजे, संचालक मंडळासाठी तिन्ही मुंडे बहिणींनी अर्ज केला होता. तर धनंजय मुंडे यांनी अर्ज भरला नव्हता.
कारखान्याच्या संचालक पदाच्या 21 जागेसाठी नऊ मे रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. संचालक पदाच्या 21 जागेसाठी एकूण 50 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत 50 पैकी 13 अर्ज नामंजूर झाले होते तर 37 अर्ज मंजूर झाले. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी खा. प्रीतम मुंडे यांच्यासह 16 जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे 21 जणांचे अर्ज शिल्लक राहीले. यामुळे 21 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. त्यामध्ये बहुतांश उमेदवार पंकजा मुंडे यांच्या गटाचे आहेत. या कारखान्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केलेला नव्हता.
बिनविरोध निवडून आलेले 21 उमेदवार:
पंकजा मुंडे, यशश्री मुंडे, केशवराव माळी, वाल्मीक कराड, श्रीहरी मुंडे, रेशीम कावळे, ज्ञानोबा मुंडे, राजेश गीते, सतीश मुंडे, अजय मुंडे, पांडुरंग फड, हरिभाऊ गुट्टे, सचिन दरक, सुरेश माने, वसंत राठोड ,चंद्रकेतू कराड ,शिवाजीराव गुट्टे ,शिवाजी मोरे ,सुधाकर सिनगारे ,सत्यभामा उत्तमराव आघाव, मंचक घोबाळे