धनंजय मुंडे, संदीप, आजबे, सोळंके, मुंदडा, पवार विजयी; पंकजा मुंडे, जयदत्त, आडसकर, पंडित, धोंडे पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:51 AM2019-10-25T00:51:49+5:302019-10-25T00:55:41+5:30

भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत या किल्ल्यास जबरदस्त खिंडार पाडले. संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या परळीमध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जवळपास ३० हजारावर मतांनी पराभव केला.

Dhananjay Munde, Sandeep, Ajabe, Solanke, Mundada, Pawar won; Pankaja Munde, Jaydutt, Adaskar, Pandit, Dhonde defeated | धनंजय मुंडे, संदीप, आजबे, सोळंके, मुंदडा, पवार विजयी; पंकजा मुंडे, जयदत्त, आडसकर, पंडित, धोंडे पराभूत

धनंजय मुंडे, संदीप, आजबे, सोळंके, मुंदडा, पवार विजयी; पंकजा मुंडे, जयदत्त, आडसकर, पंडित, धोंडे पराभूत

googlenewsNext
ठळक मुद्देबीड विधानसभा मतदारसंघामध्ये शेवटच्या फेरीपर्यंत काट्याची लढत : नमिता मुंदडा बनल्या सर्वात कमी वयाच्या आमदार

सतीश जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत या किल्ल्यास जबरदस्त खिंडार पाडले. संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या परळीमध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी जवळपास ३० हजारावर मतांनी पराभव केला. बीडमध्ये रोहयोमंत्री शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर यांचा अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये पुतणे तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप क्षीरसागर यांनी १९०० वर मतांनी पराभव केला. हे दोन्हीही निकाल महाराष्ट्राला हादरुन टाकणारे ठरले.
परळीमध्ये व्हिडीओ नाट्यामुळे भावनिकता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. शेवटच्या दोन दिवसामध्ये विकासाच्या मुद्द्यावरुन मुंडे बहीण - भावांनी वैयक्तिक टीकेवर भर दिला होता. धनंजय मुंडे यांच्या विरोधात निषेध मोर्चेही काढण्यात आले. परंतु मतदारांनी भावनेच्या आहारी न जाता धनंजय मुंडे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. या पराभवामुळे पंकजा मुंडे यांची विजयाची हॅटट्रीक हुकली.
बीडमध्येही संदीप क्षीरसागर यांनी दोन वर्षांपासून जोरदार तयारी करीत आपल्या काकांना कडवी लढत देत काठावरचा का होईना विजय संपादित करुन बीड शहराला एक नवे नेतृत्व मिळवून दिले.
आष्टीमध्ये विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. एकवेळ आष्टीमध्ये राष्ट्रवादीला तगडा उमेदवार मिळतो की नाही अशी स्थिती निर्माण केली होती. शेवटच्या क्षणी आजबे यांची उमेदवारी जाहीर झाली तेव्हा जिल्ह्याने त्यांना धोंडे यांच्या तुलनेत तुल्यबळ उमेदवार समजले नव्हते. परंतु आजबे यांनी सर्व आडाखे मोडीत काढत धोंडे यांना पराभूत केले.
गेवराईमध्ये विद्यमान आमदार भाजपचे लक्ष्मण पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह पंडित अािण शिवसेनेचे बंडखोर उमेदवार बदामराव पंडित, वंचित बहुजन आघाडीचे विष्णू देवकते यांच्यात लढत झाली. बदामराव यांच्या बंडखोरीमुळे लक्ष्मण पवार यांचा सहज वाटणारा विजय अवघड होत गेला. ७ हजार मतांच्या फरकाने त्यांनी आपली जागा राखली.
केजमध्ये राष्ट्रवादीची उमेदवारी नाकारुन नमिता मुंदडा यांनी भाजपची उमेदवारी मिळवली. त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. आणि घडलेही तसेच. नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाच वर्षे जनसंपर्क ठेवला होता. त्याचा फायदा या निवडणुकीत मुंदडा यांना मिळाला. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांनी भाजपच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांची उमेदवारी मुंदडा यांच्यासाठी कापली होती.
या निकालांची ठळक वैशिष्ट्ये काय?
जिल्ह्यात कुठल्याच पक्षाची लाट नव्हती. जे उमेदवार जनतेच्या संपर्कात होते, त्यांना मतदारांनी विजयी केले.
या निवडणुकीत धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असे चित्र पहावयास मिळाले. मतदारांनी जनशक्तीला विजयी करून धनशक्तीला चपराक दिली.
संपर्कात न राहणे, फोन न घेणे, काम न करणे, अहंकारात राहणे, टाकून बोलणे, याचा हिशेब मतदारांनी आपापल्या मतदारसंघात केला.
बीड नगर पालिकेचा कारभार भोवला
बीड नगर पालिकेचा कारभार या निवडणुकीमध्ये जयदत्त क्षीरसागर यांना चांगलाच भोवला. पाणीपुरवठा, भुयारी गटार योजनेचे रखडलेले काम आणि त्यामुळे रस्त्याची झालेली वाताहत हे कारण होते.
नगरपालिकेचा कारभार हाकताना नगराध्यक्षांनी अनेकांची नाराजी ओढावून घेतली होती. ही नाराजी देखील या निवडणुकीत पहावयास मिळाली. नगरपालिकेच्या कामासंदर्भात जनतेमधून उघड उघड नाराजी मतांमधून व्यक्त होताना दिसून येत होती.
माजलगावमध्ये आडसकर पडले नवखे
बीड जिल्ह्यात भाजपच्या उमेदवारीसाठी सर्वात जास्त चुरस माजलगावमध्ये होती. विद्यमान आमदार आर. टी. देशमुख यांची उमेदवारी काटून रमेश आडसकरांना उमेदवारी दिली. या ठिकाणी मोहन जगताप हे देखील इच्छूक होते.
आडसकरांचा तसा फक्त धारुर तालुक्याशी संपर्क होता. माजलगावमध्ये नवखे होते. याचाच फायदा प्रकाश् सोळंके यांनी घेतला. माजलगावमध्ये पाहिजे तशी आघाडी आडसकरांना मिळाली नाही. प्रकाश सोळंकेंचे या तालुक्यातील मताधिक्य पुढे धारुर आणि वडवणीमध्ये कव्हर झाले नाही.
आष्टीमध्ये घडविले ‘टू डी’ने राजकारण
आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे भीमराव धोंडे यांची बाजू तगडी होती. परंतु शेवटच्या टप्प्यात माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी भाजपची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
भाजपकडून आ. सुरेश धस यांचे पुत्र जयदत्त धस आणि साहेबराव दरेकर उमेदवारीसाठी इच्छूक होते. उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांची नाराजी सहाजिकच भीमराव धोंडे यांना भोवली. साहेबराव दरेकरांनी राष्ट्रवादीमध्ये जाऊन आजबे यांना मदत केली.

Web Title: Dhananjay Munde, Sandeep, Ajabe, Solanke, Mundada, Pawar won; Pankaja Munde, Jaydutt, Adaskar, Pandit, Dhonde defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.