Dhananjay Munde: ऊसाचे राजकारण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ- धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 07:49 PM2022-03-27T19:49:11+5:302022-03-27T19:49:22+5:30
वागबेट येथील सव्वा कोटी रुपयांच्या पेयजल योजनेसह विविध विकास कामांचा धनंजय मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ
परळी :बीड जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र यावर्षी अतिरिक्त असून संपूर्ण ऊस गाळप होण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन सर्वांनी सर्व ऊस गाळप केला जाईल यासाठी प्रयत्न करावेत. जाणीव पूर्वक राजकारण साधण्यासाठी ऊसाची अडवाअडवी कोणी करत असेल तर असे राजकारण खपवून घेतले जाणार नाही, त्यास जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे.
वागबेट गावची मागणी असलेल्या नागापूर धारणातून वागबेट येथे पाणी आणण्याच्या एक कोटी 26 लाख रुपयांच्या पेयजल योजनेसह गावातील हनुमान मंदिरासमोरील सभागृह (25 लाख) या कामांचे भूमिपूजन तसेच स्मशान भूमी, बैठक व्यवस्था, सिमेंट रस्ते आदी पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पण धनंजय मुंडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले
गावाजवळील पाणी पिण्यायोग्य नसल्याने गावचे सरपंच व सदस्यांनी नागापूरच्या धरणातून पाणी आणावे अशी मागणी होती, त्यानुसार या कामास मंजुरी देण्यात आली आहे. वागबेट गावसह तालुक्यात शेकडो सिंचन विहिरांना पंचायत समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे, तसेच याही वर्षी 5000 विहिरींना मंजुरी देण्यात येणार असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.
लोकसंख्येच्या प्रमाणाचा प्रश्न असताना देखील धनंजय मुंडे यांनी विशेष प्रयत्न करून गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मिटवला असून, हे गाव कायमस्वरूपी धनंजय मुंडे यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास गावकऱ्यांच्या वतीने सरपंच अमरनाथ गित्ते यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमास जिल्हा नियोजन समितीचे सदस्य वाल्मिक कराड, सरपंच अमरनाथ गित्ते, पंचायत समिती सदस्य माऊली मुंडे, श्रीकांत फड, हरीश नागरगोजे, बापू नागरगोजे, प्रल्हाद नागरगोजे, युनूस भाई, गोविंद कराड यांसह आदी उपस्थित होते.