आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 11:47 PM2018-08-13T23:47:27+5:302018-08-13T23:48:15+5:30
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या सवलती द्याव्यात या मागणीसाठी समाजबांधवांनी शासनाकडे अनेकवेळा विनंती केली. धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको, डोकेफोड, मुंडण आंदोलनेही केली.
बीड : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या सवलती द्याव्यात या मागणीसाठी समाजबांधवांनी शासनाकडे अनेकवेळा विनंती केली. धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्ता रोको, डोकेफोड, मुंडण आंदोलनेही केली. परंतु आरक्षणाबाबत शासनाने अद्याप कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे राज्यातील धनगर समाजबांधव आक्रमक झालेले आहेत. आरक्षणासाठी पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सोमवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली.
मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेवर उधळला भंडारा
बीड : भाजप सरकारने धनगर समाजाची आरक्षणाप्रती दिशाभूल केली आहे. केवळ पोकळ आश्वासने देऊन धनगर समाजबांधवांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम फडणवीस सरकारने केले आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेवर भंडारा उधळून धनगर समाजबांधवांच्या वतीने बीडमध्ये निषेध करण्यात आला.
मुख्यमंत्री फडवणीस यांनी बारामती येथील एका सभेत म्हणाले होते की, धनगर आरक्षण प्रश्न सत्ता आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये सोडवू. परंतु सत्ता येऊन चार वर्षे उलटली तरी सरकारने अद्याप यावर ठोस भूमिका घेतली नाही. आरक्षणासंदर्भात अभ्यास करण्यासाठी टीस संस्था नियुक्त केली. परंतु या संस्थेनेही वेळकाढूपणा केला. या सर्व परिस्थितीत केवळ धनगर समाजबांधवांची दिशाभूल झाली, असा आरोप धनगर समाजाचे भारत सोन्नर यांनी केला. त्याचाच निषेध म्हणून बीडमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रतिमेवर भंडारा उधळून निषेध करण्यात आला. यावरही दखल घेतली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन राज्यभर छेडू, असा इशाराही देण्यात आला.
बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
बीड : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशीच उपोषण करण्यात आले. यामध्ये आरक्षणासह पैठण येथील परमेश्वर घोंगडे यांनी आरक्षणासाठी आत्महत्या केली होती. त्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये मदत द्यावी आदी मागण्या करण्यात आल्या.
या उपोषणात अमर ढोणे, अंकुष निर्मळ, अॅड.रंजीत करांडे, बाबुलाल ढोरमारे, चंद्रकांत भोंडवे, संजय लकडे, बाळासाहेब प्रभाळे, मिनाताई देवकते, सुरेख सुळे, गणेश कोळेकर, मुकेश शिवगण, अॅड.सुभाष राऊत यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव, महिला यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी विविध संघटनांनी आरक्षणाला पाठिंबा दिला.
घोषणांनी दणाणला परिसर
आरक्षण आमच्या हक्काचं...येळकोट येळकोट जय मल्हार... या सारख्या विविध घोषणा उपोषणस्थळी देण्यात आल्या. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यादृष्टीने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अंबाजोगाईत बंद; बसस्थानकासमोर ठिय्या
अंबाजोगाई : आरक्षणाची मागणी करत अंबाजोगाई शहरातही सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळच्या सुमारास बसस्थानकासमोर ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली.
हजारो धनगर समाज बांधवांनी एकत्र येत शहरातून रॅली काढली आणि त्यानंतर बस स्थानकासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आरक्षणासाठी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. या आंदोलनात तरुणांची संख्या लक्षणीय होती.
सिरसाळ्यात रास्ता रोको आंदोलन
परळी : तालुक्यातील सिरसाळा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामध्ये परिसरातील अनेक गावांतील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग क्षेत्र असलेल्या परळी शहरात श्रावण महिना, पहिला श्रावणी सोमवार, नागपंचमी सणाचा बाजार व सुरू असलेल्या लिंगायत समाजाच्या अनुष्ठान सोहळा यामुळे परळी बंद व आंदोलन करण्यात आले नसल्याचे समाज बांधवांच्यावतीने सांगण्यात आले आहे.
माजलगावात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
माजलगाव : माजलगाव बंद व चक्का जामची हाक धनगर आरक्षण कृती समितीच्या वतीने देण्यात आली होती. अहिल्याबाई होळकर चौक येथे अभिवादन करून शहरातून रॅली काढण्यात आली.
व्यापारी बांधवांना धनगर समाज बांधवांनी बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करत ही रॅली संभाजी चौक, शिवाजी चौकमार्गे परभणी फाटा येथे वसंतराव नाईक चौकामध्ये आली. यावेळी परभणी फाट्यावरील राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात आले. आरक्षणाची अंमलबजावणी करीत नसल्याने शासनाच्या विरोधातही घोषणा देण्यात आल्या. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आष्टीमध्ये तहसील कार्यालयासमोर आंदोलन
आष्टी : सकाळी ११ वाजता आष्टी तहसील समोर आंदोलन केले. यावेळी सकल धनगर समाज, युवा मल्हार सेनेच्यावतीने नायब तहसीलदार प्रदिप पांडूळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी धनगर समाजबांधवानी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे, संभाजी ब्रिगेड, रिपाइं (आ. गट ) यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी अॅड. पी.बी. पारखे, अशोक ढवण, पांडुरंग गावडे, डॉ. प्रकाश शेंडगे, संजय पांढरे, अक्षय दिंडे, युवराज खटके, शंकर भांड, संजय धायगुडे, अमोल पारखे, कैलास शिंदे, बबन उकले यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडण्यासाठी आष्टी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
वडवणीमध्ये मुख्य चौकात रास्ता रोको
वडवणी : तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने वडवणी येथील बीड परळी हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी अकरा वाजता रस्ता रोको आंदालन करण्यात आले.
यावेळी सरकार विरुध्द घोषणा देत समाज बांधवांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. आंदोलकांनी आपल्या मागण्याचे निवेदन वडवणीचे नायब तहसीलदार प्रभाकर खिल्लारे यांना दिले.
रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. बंदोबस्तासाठी पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक तैनात होते.
पाडळशिंगीत अडविला राष्ट्रीय महामार्ग
गेवराई : तालुक्यातील पाडळसिंग व मादळमोही धनगर समाजाच्यावतीने युवा मल्हार सेनच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय महामार्ग २११ व २२२ अडविण्यात आला होता. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाचा आरक्षणचा मुद्दा हा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. सरकार फक्त आश्वासनांचा पाऊस पाडत आहे व धनगर समाजाची दिशाभूल करत आहेत. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती मध्ये समावेश करण्यात यावा यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन तीव्र होत आहेत. सोमवारी पाडळसिंगी येथै राष्ट्रीय महामार्ग अडविण्यात आला. विष्णु देवकते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन तहसीलदार संजय पवार यांना देण्यात आले. या वेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलनांमध्ये विष्णु देवकाते, राजु शिंदे, किरण गावडे, राजेंद्र झिगरे, पवन गावडे, शेषनारायण उघडे, आदिनाथ गावडे, नवनाथ खंडागळे, योगेश चौरे, केशव गावडे, सुरेश तवले, गजानन काळे, जालींदर पिसाळ, साईनाथ गावडे, बबन घोंगडे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मादळमोही, बधनरवाडी, सिरसमार्ग, गावडेवाडी, शहाजनपुर, लोळदगाव, ईटकुर, सिगारवाडी अशा अनेक गावांमधून समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.