बीडमध्ये आरक्षणासाठी धनगर समाजाचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 12:24 AM2018-12-18T00:24:44+5:302018-12-18T00:29:40+5:30
राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासान दिले होते. मात्र सरकारला चार चार वर्षे होत आहेत. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र संतापाची भावना आहे. तात्काळ आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी यशवंत सेनेच्या वतीने काठी न् घोंगडं मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते,
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राज्य शासनाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासान दिले होते. मात्र सरकारला चार चार वर्षे होत आहेत. मात्र आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे धनगर समाजामध्ये तीव्र संतापाची भावना आहे. तात्काळ आरक्षण लागू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी यशवंत सेनेच्या वतीने काठी न् घोंगडं मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी शेकडो कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते.
भाजपाने २०१४ साली धनगर समाजाला एस.टी. प्रवर्गातून आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्या दिवसांपासून धनगर समाज आरक्षण मिळण्याची प्रतीक्षा करत आहे. भारतीय जनता पार्टी सत्तेत येऊन चार वर्षे होत आहेत. मात्र दिलेला शब्द शासनाने पाळला नाही. त्यामुळे समाजात तसेच तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शासनाचा निषेध करण्यासाठी बीड शहरात मोर्चा काढण्यात आला. तसेच धनगर समाजाला आरक्षणाच्या मुद्द्यावर विशेष अधिवेशन बोलावून प्रश्न मार्गी लावावा अन्यथा येणाºया निवडणुकीमध्ये भाजपाला याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सोन्नर यांनी केले. यावेळी जिल्हाभरातून समाजबांधव सहभागी झाले होते.
मंत्री जानकरांना पडला विसर
आरक्षण मुद्द्यावर राजकारण करणारे व सध्या मंत्री असलेले महादेव जानकर यांना मात्र समाज आरक्षणासंदर्भांत विसर पडल्याचे चित्र आहे. आरक्षणासंदर्भात त्यांनी केलेल्या विविध वक्तव्यांमुळे धनगर समाजाचा जानकरांवरचा विश्वास उडाल्याची प्रतिक्रिया मोर्चात सहभागी नागरिकांनी दिली.
राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा
धनगर समाजाला एस.टी प्रवर्गात समाविष्ट करुन घेण्याची मागणी वेळोवेळी केली आहे. मात्र भाजप सरकार हे वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे आरक्षणासंदर्भात तात्काळ निर्णय शासनाने घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यळकोट, यळकोट
‘जय मल्हार’
मोर्चामध्ये सहभागी झालेल्या धनगर बांधवांनी काढलेल्या मोर्चामध्ये शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी धनगर आरक्षण आमच्या हक्काचे, ‘यळकोट, यळकोट जय मल्हार’च्या घोषणा देण्यात आल्या तसेच काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन देखील झाले.