धनगर आरक्षणाचा प्रश्न पुन्हा पेटला; बीडमध्ये ढोल वाजवत मोर्चा
By सोमनाथ खताळ | Published: December 26, 2022 04:08 PM2022-12-26T16:08:56+5:302022-12-26T16:09:10+5:30
अनेक कॅबिनेट बैठका झाल्या आहेत, परंतू आरक्षणाबाबत कोणीच बोलत नाही.
बीड : धनगर आरक्षणासाठी सरकार केवळ अश्वासने देत आहेत. परंतू ठोस भूमिका घेतली जात नाही. याच अनुषंगाने समाज बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. समाजाला आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांना घेऊन यशवंत सेना आक्रमक झाली होती. ढोल, झांज वाजवत समाज बांधवांनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना जागा दाखवू, असा इशारा धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी दिला. यावेळी खा.गावीत यांच्या फोटोला काळे फासण्यात आले.
आतापर्यंत धनगर समाजाच्या आरक्षणासाठी यशवंत सेना व इतर संघटनांनी अनेकदा मोर्चे काढले. आंदोलने केली. वेगवेळे अनोखे आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधले. असे असतानाही सरकारने केवळ अश्वासने दिली. भाजप सरकारने अश्वासने दिल्यानंतर सत्ता गेली. नंतर विरोधात गेल्यावर सध्याचे उपमुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी सत्ता आल्यावर आरक्षण देऊ असे अश्वासन बारामती येथील सभेत दिले होते. आता भाजप-शिंदे सरकार आले आहे. यात अनेक कॅबिनेट बैठका झाल्या आहेत. परंतू आरक्षणाबाबत कोणीच बोलत नाही. खा.सुप्रिया सुळे यांनी याबाबत आवाज उठवताच खा.गावीत यांनी याला विरोध केला. त्यामुळे गावीत यांच्याविरोधातही समाजामध्ये प्रचंड रोष आहे. गावीत यांचा निषेध करण्यासह धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, आरक्षण मिळेपर्यंत ज्या २२ योजना लागू करण्यात आलेल्या आहेत, त्यासाठी ५ हजार कोटी रूपयांची भरीव तरतूद करावी, तसेच याला चालू अधिवेशनात मंजूरी घ्यावी, अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली. भारत सोन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या मोर्चात गणेश सातपुते, कैलास निर्मळ, रामनाथ यमगर, उमेश निर्मळ, साईनाथ कैतके यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहनशिलतेचा अंत पाहू नका - सोन्नर
मागील अनेक वर्षांपासून सामाजाच्या आरक्षणासाठी यशवंत सेना लढा देत आहे. अनेकदा अनोखे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले. आताचे सत्तेतील मंत्री हे विरोधात असताना सत्ता आल्यावर आरक्षण देऊ, असे अश्वासन देतात. परंतू सत्ता आल्यावर त्यांना याचा विसर पडतो. आता धनगर समाजाची फसवणूक असून समाजाच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, असा इशाराही धनगर समाज नेते भारत सोन्नर यांनी मोर्चातून दिला आहे.