‘कायाकल्प’मध्ये महाराष्ट्रात धानोरा ग्रामीण रूग्णालय द्वितीय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 04:08 PM2019-05-07T16:08:48+5:302019-05-07T16:12:29+5:30
केज उपजिल्हा रूग्णालयासह नेकनूरचे स्त्री, नांदुरघाट, धारूर, पाटोदा ग्रामीण रूग्णालयालाही बक्षिस
- सोमनाथ खताळ
बीड : महाराष्ट्र शासनाच्यावतीने दिले जाणारे कायाकल्पचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयाने महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच केज उपजिल्हा रूग्णालयासह नेकनूरचे स्त्री, नांदुरघाट, धारूर, पाटोदा ग्रामीण रूग्णालयालाही प्रोत्साहनपर बक्षिसे दिली जाणार आहेत. या पुरस्कारांमुळे आरोग्य विभागाची मान उंचावली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कायाकल्प अंतर्गत आरोग्य संस्थांना स्वच्छतेच्या मुख्य निकषासह इतर निकषावर आधारीत राज्यस्तरीय पुरस्कार दिले जातात. यावर्षी बीड जिल्ह्यातील सात संस्थांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यामध्ये राज्यातील दुसरा दहा लक्ष रूपयांचा पुरस्कार धानोरा ग्रामीण रूग्णालयाला मिळाला आहे. तसेच धारूर, पाटोदा, नांदुरघाट या ग्रामीण रुग्णालयांसह केजचे उपजिल्हा आणि नेकनूरच्या स्त्री रूग्णालयास प्रोत्साहन एक लाख रूपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या सर्वांचा उत्तेजनार्थमध्ये समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी केजच्या उपजिल्हा रूग्णालयाने सहभाग नोंदवून यश संपादन केले होते. गतवर्षीही केजसह परळीच्या उपजिल्हा रूग्णालयांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. यामध्ये केजला दहा लाख रूपयांचा राज्यातील दुसरा तर परळीला उत्तेजनार्थ म्हणून एक लाख रूपयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश हरीदास, डॉ.सुखदेव राठोड, डॉ.संजीवणी गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व संस्था यशस्वीपणे काम करीत आहेत.
या टिमने घेतले परिश्रम
आरोग्य सेवा उत्कृष्ट देऊन कारभार सुधारण्यात धानोऱ्याचे डॉ.रंजीत जाधव, धारूरचे डॉ.बालासाहेब सोळंके, डॉ.चेतन अदमाने, केजचे डॉ. दिपक लांडे, पाटोद्याचे डॉ. महादेव चिंचोले, नेकनूरचे डॉ.सुधीर राऊत, नांदुरघाटच्या डॉ. महानंदा मुंडे या वैद्यकीय अधीक्षकांनी यासाठी परिश्रम घेतले. या पुरस्कारात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
राजकीय आरोपांना प्रत्युत्तर
लोकसभा निवडणूकीदरम्यान, आरोग्य विभाग काम करीत नाही. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यावर राजकीय आरोप झाले. मात्र, आपण आरोग्य सेवेत राजकारण आणत नाही. तात्काळ व तत्परे सेवा देण्याबरोबरच प्रशासन सुधारून राज्यात अव्वल ठरू शकतोत, हे या पुरस्कारांच्या माध्यमातून समोर आले आहे. आपल्या कामाच्या माध्यमातनू डॉ.थोरात यांनी आरोप करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आरोग्य विभागात आहे.
महाराष्ट्र शासनाकडून पुरस्कार जाहीर झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. यापुढेही कामाची लय कायम ठेवली जाईल. आम्हाला यामुळे नक्कीच प्रोत्साहन मिळेल. हे सर्व यश माझ्या टिमचे आहे.
- डॉ.अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड