धारूर, केज पाणीपुरवठा योजनेचा तिढा सुटेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:38 AM2021-03-01T04:38:42+5:302021-03-01T04:38:42+5:30
धारूर : धारूर, केज, सहबारा खेडी पाणीपुरवठा योजनेचे चालू वीजबिल भरण्यास धारूर नगरपरिषद व केज नगरपंचायत तयार असताना ...
धारूर : धारूर, केज, सहबारा खेडी पाणीपुरवठा योजनेचे चालू वीजबिल भरण्यास धारूर नगरपरिषद व केज नगरपंचायत तयार असताना महावितरणने नकार दर्शविला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर जनतेचे पाण्यावाचून हाल होत आहेत. धारूर नगर परिषद चालू थकीत वीज बिलापोटी ४० लक्ष रुपये भरण्यास तयार असताना व जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना देऊनही महावितरण वीज जोडत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. खासगी टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ जनतेवर आली आहे. धनेगाव धरणावरून असणारी केज, धारूरसह, बारा खेडी पाणी पुरवठा योजना सव्वा ते दीड लाख लोकांची तहान भागवते. या योजनेच्या देखभाल-दुरूस्तीची जबाबदारी पाणी पुरवठा विभागाकडे असताना, धारूर नगर परिषद व केज नगर पंचायतीलाच नियमित देखभाल दुरूस्ती करून पाणी पुरवठा सुरळीत ठेवावा लागतो. तसेच भालगाव व सोनीजवळ येथील विद्युत बिलाचा भारही उचलावा लागतो. त्यामुळे ४ ऑगस्ट २०१७ रोजी तत्कालीन ऊर्जामंत्री व पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार तत्कालीन जिल्हाधिकारी, धारूर, केज स्थानिक स्वराज्य संस्था, महावितरण व जि. प. बीडच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन या विषयावर तोडगा काढला होता. नियमितचे वीज बिल धारूर व केज नगरपालिकेने, तर भालगाव येथील टक्केवारीनुसार भरावे व जुनी थकबाकी बीड जिल्हा परिषदेने भरावी, असे या बैठकीत ठरले होते.
या योजनेवर वीज बिलापोटी धारूर नगर परिषदेने ३ कोटी ६० लाखांपेक्षा जास्त रक्कम, तर केज नगरपंचायतीने २ कोटी ५० लाख रुपयेपेक्षा जास्त रक्कम भरली असून, या रकमेत नियमित वीज बिलांचा समावेश आहे. मात्र कोरोनाकाळात पुन्हा बिल भरता आले नाही. केज धारूरसह बारा खेडी पाणी पुरवठा योजनेपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्या इतर योजनांची वीज जोडणी मात्र खंडित केलेली दिसत नाही.
नागरिकांची गैरसोय करू नका
धनेगाव धरणावरून असणाऱ्या केज, धारूरसह बारा खेडी पाणी पुरवठा योजनेचे चालू बिल भरण्यास तयार असताना, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा तोडून नागरिकांची गैरसोय केली आहे. जिल्हा परिषदेने खेड्यांचे विजबिल भरणे आवश्यक आहे. तसा निर्णय चार वर्षांपूर्वी झाला आहे. तो पाळावा आणि तात्काळ योजनेची वीजजोडणी करून पाणी पुरवठा सुरळीत करावा.
- स्वरूपसिंह हजारी, नगराध्यक्ष, धारूर