धारुरचा दोन कोटी रुपयांचा निधी जाणार परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 11:59 PM2018-06-07T23:59:10+5:302018-06-07T23:59:10+5:30

Dharur will be given two crore rupees back | धारुरचा दोन कोटी रुपयांचा निधी जाणार परत

धारुरचा दोन कोटी रुपयांचा निधी जाणार परत

Next

अनिल महाजन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे दोन वर्षांपासून रस्ते विकास व वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील विकास कामासाठी आलेला दोन कोटी रुपयांचा विकास निधी जूनअखेर परत करण्याची नामुष्की धारूर नगरपालिकेवर येणार आहे. या माहितीला मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे चौकशी केली असता दुजोरा दिला आहे.

धारुर नगरपालिका सध्या भाजपच्या ताब्यात असून, गल्लीपासून दिल्लीपर्यंत या पक्षाची सत्ता आहे. मात्र, विकासाचा वेग शहरात म्हणावा तसा दिसत नाही. अशी परिस्थिती असताना २०१५-२०१६ या आर्थिक वर्षात राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून शहरातील रस्ते विकासासाठी एक कोटी व वैशिष्ट्यपूर्ण विकास योजनेचा एक कोटी रुपये निधी आला. मात्र, दोन वर्षांपासून हा निधी खर्च करण्यात आला नाही.
हा निधी नगरपालिकेकडे पडून आहे. या निधीमधून काही कामे प्रस्तावित करून जिल्हाधिकारी कार्यालयात मंजुरीसाठी पाठवली. मात्र, चार महिन्यांतर त्रुटी काढून हा प्रस्ताव परत आला. मात्र, याबाबत दोन वर्ष नगरपालिकेने कसलीही कारवाई केली नाही.

दोन वर्षात हा विकास निधी खर्च न केल्याने ३० जूननंतर हा निधी नगरविकास विभागाला परत करण्याची नामुष्की धारूर नगरपालिकेवर येणार आहे. राहिलेल्या कालावधीत हा निधी खर्चाची प्रक्रिया होऊ शकत नसल्याने हा निधी परत केल्याशिवाय नगरपालिकेला गत्यंतर नाही हे मात्र निश्चित. या निधीमधून शहरातील विविध कामे होऊ शकली असती. मात्र, नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे हा विकास निधी आता परत जाणार आहे.

राजकारण अन् हलगर्जीपणामुळे रखडला विकास
धारुर नगर पालिकेतील राजकारण आणि प्रशासनाकडून होणारी हलगर्जी यामुळेच हा निधी परत जाणार असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून केला जात आहे. वेळीच हा निधी खर्च केला असता तर धारुच्या विकासात भर पडली असती, अशा प्रतिक्रियाही सर्वसामान्यांमधून उमटू लागल्या आहेत.

विकास निधी परत जाणार नाही म्हणून प्रयत्नशील
धारुर नगरपालिकेचा विकास निधी परत जाणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करून संबंधित रस्ते विकासचा निधी शहरातील पाईप लाईनच्या कामामुळे खर्च करता आला नाही. राहिलेल्या विकास निधीचे प्रस्ताव तयार केले असून, हा निधी परत न जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. हा निधी परत जाणार नाही.
- रंजना बालाजी चव्हाण,

बांधकाम सभापती
कमी कालावधीमुळे निधी खर्च करणे अशक्य
धारुर नगरपालिकेला २०१५-२०१६ मध्ये आलेला रस्ते विकास व वैशिष्ट्यपूर्ण योजनेचा निधी खर्च न झाल्याने ३० जूननंतर परत करावा लागणार हे खरे आहे. हा निधी खर्च करण्यासाठी कालावधी नाही. हा निधी खर्च करण्यासाठी प्रस्ताव केले. मात्र, प्रस्तावात त्रुटी निघाल्याने ही कामे मंजुरीच्या प्रतीक्षेत राहिली.
- विशाल भोसले,
मुख्याधिकारी, धारुर नगरपालिका

सत्ताधारी गटाचा गलथानपणा कारणीभूत
धारुर नगरपालिकेचा कारभार म्हणजे रामभरोसे झाला आहे. सत्ताधारी गटाचे कुठलेही नियंत्रण कारभारावर नाही. शहरात दोन वर्षात कुठलेही विकास काम झालेले नाही. उलट आलेला निधी परत जाणे यासारखी निंदनीय बाब नाही. हा विकास निधी परत जाण्यास सर्वस्वी जबाबदार सत्ताधारी गटच कारणीभूत आहे.
- उज्वला सुधीर शिनगारे,
गटनेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस

नगरपालिकेची कार्यपध्दती कारणीभूत
धारुर नगरपालिकेत सध्या मनमानी कारभाराचा कळस झाला असून विकास निधी परत जाण्यासारखे दुर्दैव दुसरे कोणतेही नाही. सत्ताधाऱ्यांनी शहराचा विकास करण्यापेक्षा भकास करण्याचे धोरण राबवत असल्याचे यावरून दिसून येत आहे. हा विकास निधी परत जाण्यास कारणीभूत यंत्रणेवर कारवाई करावी.
- माधवराव निर्मळ,
नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Dharur will be given two crore rupees back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.