‘डायलेसिस’मुळे २५६० रूग्णांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:41 PM2019-06-01T23:41:05+5:302019-06-01T23:41:33+5:30
विविध कारणांमुळे किडण्या निकामी झाल्यास डायलेसिस हा पर्याय उत्तम ठरू पहात आहे. जिल्हा रूग्णालयात आतापर्यंत २ हजार ५६० रूग्णांना या डायलेसिसमुळे जीवदान मिळाले आहे. अपुरे मनुष्यबळ आणि अपुऱ्या यंत्र सामग्रीवरही डायलेसिस विभागाचे काम मराठवाड्यात अव्वल आहे
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : विविध कारणांमुळे किडण्या निकामी झाल्यास डायलेसिस हा पर्याय उत्तम ठरू पहात आहे. जिल्हा रूग्णालयात आतापर्यंत २ हजार ५६० रूग्णांना या डायलेसिसमुळे जीवदान मिळाले आहे. अपुरे मनुष्यबळ आणि अपुऱ्या यंत्र सामग्रीवरही डायलेसिस विभागाचे काम मराठवाड्यात अव्वल आहे.
साप चावलेले, मधुमेह, लठ्ठपणा, जळालेले, विष प्राशन केलेले, विविध अपघातांत जखमी झालेले या सारख्या विविध कारणांमुळे मनुष्याच्या किरण्या निकामी होतात. किडनीचा विकार बळावल्यानंतर त्याच्यावर होणारे सर्व उपचार जेव्हा निष्क्रिय ठरतात आणि किडनी निकामी होते. त्या वेळी शरीरातील रक्त शुद्धीकरणाचे कार्य कोणीतरी करणे आवश्यक असते. त्यासाठी डायलेसिस हा पर्याय उत्तम ठरतो.
डायलेसिस मशीनद्वारे रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकून शुद्ध रक्त शरीरात पुरविले जाते. किडनीसारखेच कृत्रिमरीत्या हे मशीन काम करते. त्यामुळे रक्तातील क्रिएटिन, युरियासारखे विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात. शरीरातले जास्तीचे पाणी बाहेर काढले जाते. शरीरातील क्षारांचे प्रमाण हे मशीन नियंत्रणात ठेवते. डायलेसिसची सुरुवात तेव्हाच होते, जेव्हा किडनी पूर्णत: निकामी होते.
या विभागात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, डॉ.सतीश हरीदास, डॉ.आय.व्ही.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.मनोज मुंडे, प्रमुख स्वाती माळी, परिचारीका उज्वला खिल्लारे, टेक्निशियन किशोर धुणगव, वसंत घुले, प्रीती कुलकर्णी, सेवक माने हे काम करतात.
१२ ते ८० वर्षापर्यंतचे रूग्ण घेतात उपचार
१२ ते ८० वर्षापर्यंतचे रूग्ण या विभागात उपचार घेतात. आठवड्यातून दोन वेळा डायलेसिस करण्यासह त्यांचे रक्त तपासणी करणे, रक्त बदलन्याचे काम केले जाते. तसेच कुटुंबियांनी रूग्णाला मानसिक आधार देणे हे प्रामुख्याने गरजेचे आहे. रूग्ण जेव्हा सकारात्मक दृष्टीने पाहतो, त्यावेळी त्याच्यावरील उपचारांना अत्यंत चांगला प्रतिसाद देतो.
सर्वसामान्यांचा आर्थिक खर्चही वाचला
जिल्हा रूग्णालयात हा विभाग स्थापन झाल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारी आर्थिक झळ कमी झाली आहे. खाजगी रूग्णालयात एकावेळी डायलेसिस करण्यासाठी किमान तीन ते चार हजार रूपये लागतात, असे सांगण्यात आले.
विभागात आलेल्या प्रत्येक रूग्णाची काळजी घेतली जाते. तात्काळ व तत्पर सेवा देऊन त्याच्यावर दर्जेदार उपचार करण्यासाठी विभाग कटिबद्ध असतो. दिवसेंदिवस रूग्ण संख्या वाढत आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन, डॉक्टरांचे सहकार्य आणि टेक्निशियन, परिचारीकांचे परिश्रम यामुळे आम्ही यशस्वी होत आहोत.
- स्वाती माळी
विभाग प्रमुख, डायलेसिस विभाग, जिल्हा रूग्णालय बीड