बीड बसस्थानकातील हिरकणी कक्ष सुरू, पण सर्वत्र अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:33 AM2021-01-03T04:33:52+5:302021-01-03T04:33:52+5:30
बीड : जिल्ह्यातील प्रत्येक बसस्थानकात महिलांना आपल्या चिमुकल्याला सुरक्षित स्तनपान करता यावे, यासाठी हिरकणी कक्ष आहे. परंतु, अनेक ठिकाणी ...
बीड : जिल्ह्यातील प्रत्येक बसस्थानकात महिलांना आपल्या चिमुकल्याला सुरक्षित स्तनपान करता यावे, यासाठी हिरकणी कक्ष आहे. परंतु, अनेक ठिकाणी हा कक्ष बंद अवस्थेत आहे. बीड बसस्थानकातील कक्ष सुरू असला तरी कक्षात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून आले. स्थानकप्रमुख भीमकिरण बनसोडे यांच्या निदर्शनास हा प्रकार आणताच त्यांनी स्वच्छता करण्याच्या सूचना केल्या. शनिवारी दुपारी चार वाजता लोकमत चमूने येथे भेट दिली असता हा प्रकार निदर्शनास आला.
बीड बसस्थानकात प्रवाशांची संख्या पाहता येथील जागा अपुरी पडते. परंतु, आहे त्या जागेतही प्रवाशांना आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याचे दिसत आहे. स्वच्छता, पाणी, बसण्यासाठी जागा नाही. तसेच परिसरातही धूळ असते. याचा त्रासही प्रवाशांना होतो. याबरोबरच हिरकणी कक्षाचीही दुरवस्था झालेली दिसत आहे. या कक्षाची नियमित स्वच्छता केली जात नाही. शनिवारी पाहणी केली असता कक्षाच्या बाजूलाचा एक मद्यपी झोपलेला होता. तसेच कक्षात पलंग होता, परंतु त्यावरील गादी फाटलेली होती. बाजूलाही साहित्य पडलेले होते. एक पाण्याची अर्धवट बाटलीही होती. तसेच कक्षाच्या वरती जाळ्या झाल्या होत्या. कक्षाच्या भिंतीही थुंकल्यामुळे रंगलेल्या दिसल्या. अस्वच्छता असल्याने याकडे महिला फिरकत नसल्याचे दिसून येते.
कक्षाबद्दल महिलाही अनभिज्ञ
हिरकणी कक्ष प्रत्येक बसस्थानकात असतो. परंतु, याबाबत अनेक महिलांना माहिती नसते. त्यामुळे आहे त्या ठिकाणीच त्या आपल्या चिमुकल्याला स्तनपान करतात. यात त्यांना अनेकांच्या वाईट नजरेचा सामना करावा लागतो. हा कक्ष माहिती करून देण्यासाठी लाऊडस्पिकरद्वारेही वारंवार माहिती देणे आवश्यक आहे. यामुळे महिला अधिक जागरूक होऊन कुचंबना टळेल.
कधी कुलूप तर कधी मद्यपींचा वावर
सध्या हा कक्ष सुरू असला तरी अनेकदा या ठिकाणी मद्यपींच्या भीतीने याला कुलूप लावले जाते. कक्षाला कुलूप दिसल्यानंतर महिला परत जातात. चावी कोणाकडे आहे आणि कसे विचारणार, असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यामुळे या कक्षाजवळ सुरक्षा रक्षकांनीही चक्कर मारणे गरजेचे आहे.
लगेच स्वच्छता करू
बसस्थानकातील हिरकणी कक्ष सुरू आहे. नेहमी स्वच्छताही केली जाते. येथे महिलाही येऊन बाळाला स्तनपान करतात. थोडीफार घाण आहे. ती लगेच सूचना करून स्वच्छ करून घेतली जाईल. जास्तीत जास्त महिलांनी या कक्षाचा लाभ घ्यावा.
-भीमकिरण बनसोडे
स्थानक प्रमुख, बसस्थानक बीड