राष्ट्रवादीने बारा किमीचा तरी रस्ता केला का? - पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:51 PM2019-03-09T23:51:31+5:302019-03-09T23:52:43+5:30
मुंडे साहेबांचा धसका घेऊन प्रत्येक तालुक्यात विधान परिषदेची आमदारकी वाटून जिल्हयाचे वाटोळे करणाऱ्या राष्ट्रवादीने बारा किलोमीटर तरी रस्ते केले का, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : बीड जिल्हा हा लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा जिल्हा आहे, ही जाण केंद्र व राज्यातील भाजप सरकारला असल्यामुळेच कधी नव्हे तो कोट्यवधी रु पयांचा विकास निधी या जिल्हयात आला, रस्ते, रेल्वे व जलयुक्त शिवारच्या माध्यमातून मोठी कामे याठिकाणी झाल्याने हा जिल्हा विकासाच्या महामार्गावर आणण्यात आपल्याला यश मिळाले आहे, असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी शनिवारी गेवराई येथे केले. दरम्यान, मुंडे साहेबांचा धसका घेऊन प्रत्येक तालुक्यात विधान परिषदेची आमदारकी वाटून जिल्हयाचे वाटोळे करणाऱ्या राष्ट्रवादीने बारा किलोमीटर तरी रस्ते केले का, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
राष्टÑीय महामार्गाच्या येडशी- औरंगाबाद टप्प्याचे लोकार्पण आणि इतर विकास कामांच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी खा. प्रीतम मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. लक्ष्मण पवार, आ.सुरेश धस, आ. भीमराव धोंडे,आ. आर.टी. देशमुख, आ. संगीता ठोंबरे , जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, रमेश आडसकर यांच्यासह विविध पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, २०१४ मध्ये गडकरी यांच्याकडे रस्ते विकास खाते आले आणि त्यांनी प्रत्येक जिल्हयात हजारो कोटी रु पयांचे रस्ते निर्माण केले. या रस्त्यामुळे मराठवाड्यात विकासाची नवी पहाट उगवली. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यानंतर हा गोपीनाथ मुंडेंचा जिल्हा आहे याची सत्तेला जाण होती. म्हणून जास्तीत जास्त निधी जिल्ह्याला मिळाला. माझा जिल्हा कोल्हापूर, सांगलीसारखा झाला पाहिजे, यासाठी आपण काम केले. रेल्वे, रस्ते, प्रशासकीय इमारती तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कोट्यवधी निधी आणला. जलयुक्त शिवार मधून पाण्याची टंचाई दूर केली. उज्ज्वला योजनेतून महिलांच्या डोळ्यातील धुराचा त्रास कमी केला. संपूर्ण स्वच्छता योजनेतून शौचालय उभारून स्वच्छता आणि आरोग्य सुधारले असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे, आ. सुरेश धस यांनीही भाषण केले. बीड, माजलगाव, गेवराई तालुक्यातील लोक बहुसंख्येने उपस्थित होते.
साहेबांनी शब्द दिला अन् मी तो पाळला
आ. लक्ष्मण पवार यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर करावी अशी मागणी करणाऱ्या कार्यकर्त्यांना उद्देशून पंकजा मुंडे यांनी ‘आम्ही शब्द पाळणारे आहोत’ असे सांगितले. त्या म्हणाल्या, बाप्पासाहेब पवार यांना त्यांच्या मुलाला आमदार करण्याचा शब्द लोकनेते मुंडे साहेबांनी दिला होता. पण तो शब्द पंकजा मुंडेंनी पाळला आणि पहिले तिकीट जाहीर केले. माझ्या मनात कसलाही संकोच नाही. तुम्हीच मध्यंतरी कुणाला घरी बोलावले, सत्कार केले. मी मात्र या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात लक्ष्मण पवार यांच्या मागणीवरून निधी दिला, जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे असेही त्या म्हणाल्या.
बारा आमदार दिले, काम काय केले?
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी आपल्या जिल्ह्याचा विकास कधीच केला नाही. मुंडे साहेबांचा धसका घेऊन प्रत्येक तालुक्यात विधान परिषद आमदारकी त्यांनी वाटली, जिल्ह्यात बारा आमदार दिले पण या बारा आमदारांनी बारा किलोमीटर तरी रस्ते केले का, हा सवाल आपण त्या नेतृत्वाला केला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सत्तेत कधी प्रशासकीय इमारती दिल्या नाहीत. रस्ते, पाणी,वीज यासाठी झगडावे लागले. लाख, २ लाख देऊन बोळवण केली जायची.