गावात खरंच एवढ्या पाण्याच्या टँकर खेपा झाल्या का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:02 AM2021-03-04T05:02:37+5:302021-03-04T05:02:37+5:30
अमोल जाधव नांदुरघाट : २०१९ मध्ये काही गावात पाणीटंचाइ लक्षात घेता पाणी टँकर सुरू केले होते. त्यासाठी गावातील बोर, ...
अमोल जाधव
नांदुरघाट : २०१९ मध्ये काही गावात पाणीटंचाइ लक्षात घेता पाणी टँकर सुरू केले होते. त्यासाठी गावातील बोर, विहीर अधिग्रहण करून तेथून पाणी गावाला दिले होते; परंतु वास्तवात त्या ठिकाणाहून किंवा गावात एवढ्या टँकरच्या खेपा खरंच केल्या आहेत की नाही, हे जनतेने ठरवायचे. आपल्या पुढाऱ्यांनी गुत्तेदाराच्या संगनमताने गावाला पाणी पाजण्याऐवजी पळवले का, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
२०१९ मध्ये काही टंचाईच्या काळात शेतकऱ्यांचे बोर व विहीर शासनाने अधिग्रहण केले होते. प्रतिदिन सहाशे रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांना चेकद्वारे पैसे येऊ लागले आहेत. काही रक्कम सुरुवातीला मिळाली आहे; परंतु जवळपास ८० टक्के रक्कम तशीच शासनाकडे होती. त्यातील बहुतांश रक्कम येऊ लागली आहे परंतु गाव पुढारी व मध्यस्थी दलाल हे तो चेक घेऊन परस्पर उचलण्याचा प्रकार होऊ शकतो. तसेच चेक निघण्यासाठी कोणालाही पैसे द्यावे लागत नाहीत.
महत्त्वाचे म्हणजे गावात टँकरने खरंच तेवढ्या खेपा केल्या आहेत का, हे प्रत्येक गावातील सुजाण नागरिकांनी पाहिले पाहिजे. जर गावात टँकर न येता पैसे उचलत असतील तर जनतेनेच त्या गाव पुढाऱ्यांना जाब विचारला पाहिजे.
आलेल्या रक्कमा पुढीलप्रमाणे
नांदुरघाटमध्ये १९ एप्रिल २०१९ पासून टॅंकर सुरू केले. ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत सुरू होते. म्हणजे जवळपास सहा महिन्याचा कालावधी टॅंकरने गावाला पाणीपुरवठा होता म्हणजे १६५ दिवस ५ टँकरने पाणीपुरवठा केला. हे टँकर भरण्यासाठी पाच शेतकऱ्यांचे बोर, विहीर अधिग्रहण केले होते. यामध्ये हरी राम जाधव (९९,००० रुपये), भागवत खोमणे (९९,००० रुपये), दत्तू सागरे (९७,२०० रुपये), दिलावर शेख (९६,००० रुपये), शेख नसीर बशीर (९४,२०० रुपये, सर्व रा. नांदुरघाट) या शेतकऱ्यांना टँकर भरून दिले म्हणून पाण्याचे पैसे त्यांच्या खात्यावर काही आले व येऊ लागले.
तसेच नांदुरघाट सर्कलमधील हंगेवाडी येथे पाणी पुरवठा करण्यासाठी १४६ दिवस दोन टँकर पाणीपुरवठा केला. त्यासाठी उद्धवराव रामभाऊ जाधव (६९,०००) व सोमीनाथ शाहू हंगे (८७,६००) यांचे अधिग्रहण केले. त्यांना एवढी रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे.
तसेच माळेवाडीत मधुकर अभिमान गदळे (८८,२०० रु), सांगवीत मच्छींद्र दत्तात्रेय धस (९१,८००), नारेवाडीत त्रिंबक ज्ञानोबा शेळके (१३,८००) असे पैसे आहेत. नाहोली येथे तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. त्यासाठी गहिनीनाथ बाबुराव बिक्कड ६४,२००, दत्तात्रेय मुळे दैठणा १५,६००, नवनाथ भीमा केदार ४३,२०० असे पैसे आहेत.
नाहोली येथे १०७ दिवस टॅंकरने पाणीपुरवठा केला. तसेच शिरूर घाट येथे विशेष म्हणजे एकाच टॅंकरने (MHEB 7624) सर्व सात उद्भवावरून खेपा केल्याचे दिसून आले. यामध्ये श्यामराव सुखदेव सांगळे १,२००, कुमराबाई श्रीरंग कदम राजेगाव १६,२००, प्रभाकर आश्रुबा शिंदे ३८,४००, संदिपान रामभाऊ फाटक ३,६००, अण्णासाहेब गोपीनाथ केदार ३७,२००, सुषेन नारायण गीते ६९,०००, महादेव भगवान केदार ४९,८०० या सात ठिकाणाहून शिरूरघाटला एकाच टॅंकरने पाणीपुरवठा केला. वरील सर्व रक्कम शेतकऱ्यांना टँकर भरले म्हणून पाण्याचे पैसे आले आहेत. यातील काही रक्कम सुरुवातीला देण्यात आली; परंतु बहुतांश रक्कम राहिली आहे. ती लवकरच मिळायला सुरुवात होणार आहे व चालू झाली आहे. वरील शेतकऱ्यांनी आपली रक्कम कोणालाही देऊ नये. तसेच गावकऱ्यांनी त्या गावात खरंच एवढ्या टँकरच्या खेपा झाल्या होत्या का, याचे परीक्षण करणे गरजेचे आहे.