खाद्यपदार्थांत भेसळखोरांनी विष तर कालवले नाही ना ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:37 AM2021-08-19T04:37:10+5:302021-08-19T04:37:10+5:30
भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री केल्यास होणार तुरुंगवारी बीड : कमी वेळेत सर्वाधिक नफा मिळविण्यासाठी काही लोक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करतात. ...
भेसळयुक्त खाद्यपदार्थ विक्री केल्यास होणार तुरुंगवारी
बीड : कमी वेळेत सर्वाधिक नफा मिळविण्यासाठी काही लोक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी अन्न पदार्थाचे नमुने तपासले जातात. ते जर निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले तर संबंधिताला गंभीर शिक्षा होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे निकृष्ट दर्जाची व भेसळयुक्त पदार्थापासून नागरिकांनी देखील खरेदी करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
सणासुदीचे दिवस जवळ आल्यानंतर मिठाई व इतर तयार अन्न पदार्थ खरेदी करण्यावर नागरिकांचा भर वाढलेला आहे. मात्र, त्यामध्ये वापरण्यात येणारे अन्नघटक हे कोणत्या दर्जाचे आहेत याची खात्री करणे गरजेचे आहे. खाद्यपदार्थाच्या पाकिटांवर दिलेले अन्न घटक प्रमाणात आहेत का ? याची देखील खातरजमा करणे गरजेचे आहे. खुले अन्न पदार्थ खरेदी करताना मात्र खात्रीशीर दुकानातून खरेदी करणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल हा दर्जेदार असला पाहिजे.
तेल, खवा, विविध पदार्थ यामध्येही भेसळीचे प्रमाण सणासुदीच्या दिवसात वाढते. असे भेसळयुक्त अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असते त्यामुळे खरेदी करताना सर्व बाबी तपासून अन्नपदार्थ खरेदी करावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
खरेदी करताना घ्या काळजी
ग्राहकांनी वस्तूंची खरेदी करताना त्यावर कुठला मार्क आहे. ते तपासून पाहणे गरजेचे आहे. ग्रीन मार्क असेल तर वस्तू शाकाहरी आहे. ब्राऊन मार्क असेल तर मांसाहाराचा अंश त्यामध्ये असतो. उत्पादन वापरण्यापूर्वी तयार व अंतिम दिनांक तपासणे गरजेचे आहे.
तपासण्या वाढवण्याची गरज
कोरोना काळात सर्व नमुने घेण्याचे प्रमाण कमी झाले होते. तसेच ग्राहकांची झुंबड असल्यामुळे भेसळयुक्त पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री झाले होते. त्यानंतर आता सणासुदीचे दिवस जवळ आले असून, अन्न औषध विभागाकडून नमुने वाढवण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त केले जात आहे.
सणासुदीत भेसळ वाढते
दरवर्षी सणासुदीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त अन्न पदार्थ मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. खासकरून खाद्यतेलामध्ये भेसळ केली जाते. तसेच खवा, पेढा, पनीर अशा दुग्धजन्य पदार्थांमध्ये मोठी भेसळ केली जात असल्याचे चित्र आहे.
आमच्या विभागाला भेसळीच्या चाचण्या करण्यासाठी उद्दिष्ट देण्यात येते. मध्यंतरी कोरोना काळात तपासणी प्रमाण कमी झाले होते. मात्र, पुढील काळात सणासुदीचे दिवस लक्षात घेत तपासण्या वाढवल्या जाणार आहेत. त्यामुळे दुकानदारांनी उत्तम दर्जाचे अन्न पदार्थ विक्री करावेत व ग्राहकांनी देखील खरेदी करताना काही आढळल्यास विभागाशी संपर्क साधावा
इम्रान हाश्मी, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन बीड
भेसळ किती ?
कधी घेतलेले नमुने भेसळ
२०२० १६२ २४
जानेवारी १३ ०२
फेब्रुवारी ०३ ०१
मार्च ०८ ०१
एप्रिल ०२ ००
मे ०० ००
जून ०७ ००
जुलै १५ ००