सत्ता असताना एक वीटही लावली नाही, आता श्रेय घेण्यासाठी आटापिटा : पंकजा मुंडे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 03:45 PM2023-03-04T15:45:23+5:302023-03-04T15:46:04+5:30

जनतेच्या विकास अन् सुख-शांतीला नख लावण्याचा प्रयत्न सहन करणार नाही 

Didn't lay a single brick when in power, now struggling to get credit: Pankaja Munde | सत्ता असताना एक वीटही लावली नाही, आता श्रेय घेण्यासाठी आटापिटा : पंकजा मुंडे

सत्ता असताना एक वीटही लावली नाही, आता श्रेय घेण्यासाठी आटापिटा : पंकजा मुंडे

googlenewsNext

परळी (बीड): सत्ता हातात असताना ज्यांना गावच्या विकासाची एक वीटही लावता आली नाही ते आता भाजपच्या सत्तेत आम्ही मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मात्र पुढे येत आहेत. जनतेच्या विकासाला आणि सुख-शांतीला नख लावण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशा आक्रमक शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार धनंजय मुंडे यांचे नाव न घेता विरोधकांचा समाचार घेतला.

तालुक्यातील लोणी व कौठळी येथे सहा कोटी रूपये खर्चाच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुक्रवारी ग्रामस्थांच्या साक्षीने मोठया थाटात झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. लोणी येथे व्यासपीठावर भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप बिडगर, तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, रमेश कराड, उत्तमराव माने, जयश्री मुंडे, राजेश गिते, लक्ष्मीकांत कराड, संतोष सोळंके, चंद्रकांत देवकते, बळीराम गडदे, प्रा. वाघमोडे, सरपंच जयश्री भरत सोनवणे, उप सरपंच किश्किंदा प्रल्हाद शिंदे तर कौठळी येथे सरपंच अनिता काटे, उप सरपंच साहेबराव चव्हाण,, पप्पू चव्हाण आदी उपस्थित होते. 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी इथल्या लोकांसाठी चाळीस वर्षे खस्ता खाल्ल्या, त्यांना जावून आज नऊ वर्षे झाली पण आजही परळी त्यांच्याच नावानं ओळखली जाते कारण त्यांनी इथल्या लोकांचा सन्मान वाढवण्याचं काम केलं, अगदी तसंच काम माझ्या हातून होईल. माझ्या परळीची मान मी  कधीही खाली जावू देणार नाही. आता तुम्हीच मला दत्तक घ्या, तुमच्या साथीने मतदारसंघ पुन्हा नव्याने बांधू अशी साद भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी जनतेला घातली.

मतदारसंघातील प्रत्येक गांव विकासानं परिपूर्ण व्हावं हे मुंडे साहेबांचं स्वप्न होतं. पालकमंत्री असताना त्यासाठी मी अथक प्रयत्न केले. निधी देताना हात आखडता घेतला नाही की कोणताही पक्ष, जात, धर्म पाहिला नाही, सर्वाना न मागता दिलं तथापि, कुणाकडून अपेक्षाही ठेवली नाही. एवढी कामं केली पण कधी श्रेय घेतलं नाही, हे मात्र माझं चुकलं. देशात आणि राज्यातही भाजपचं सरकार असताना विरोधक मात्र हे सर्व आम्हीच केलं असल्याचा फुकटचा आव आणत आहेत. अडीच तीन वर्षे सत्ता होती, त्यांनी एक तरी काम केलं का? असा सवाल त्यांनी केला. दोन्ही पाणी योजनांचं काम दर्जेदार झालं पाहिजे. लोकांना पाणी देण्यासाठी आपण आहोत, परळीच्या नगरपरिषदे सारखे फक्त खड्डे खोदू नका असं त्यांनी सांगितलं.

प्रत्येक गाव विकासानं नटवलं
पूर्वी आपली सत्ता नसताना दोन तीन लाखाचा निधी मिळायचा पण मी पालकमंत्री झाल्यावर एकेका गावाला कोटी दोन कोटीचा निधी दिला. प्रत्येक गावाला नटवण्याचं काम केलं. गावच्या विकासाचं डिझाईन स्वतः तयार केलं. समान निधी वाटप केला. पीक विमा, अनुदान सर्व काही दिलं. पुन्हा संधी मिळाली असती तर आज चित्र वेगळं असतं अअसेही त्या म्हणाल्या.

पिढी बिघडवणारे नेते पाहिजेत की घडवणारे
आम्ही करमणुकीचे कार्यक्रम करण्यासाठी राजकारणात नाहीत. विकासा बरोबरच पिढी घडवणारे, महिलांना सन्मान देणारे नेते पाहिजेत की बिघडवणारे हे तुम्ही ठरवा. राजकारणात चांगल्या माणसाला साथ देणं तुमच काम आहे. मला तुमच्याकडून काही नकोय पण माझ्या परळीचं नाव खराब नाही झालं पाहिजे. तुमची प्रतिष्ठा जपणं, तुम्हाला भूषण वाटेल असेच काम माझ्या हातून होईल. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नका, वैद्यनाथ साखर कारखाना पुन्हा सुरू करणार आहे. काही चुकीच्या गोष्टी बंद करून पुन्हा मला तो सुरू करायचा आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचेशी माझी चर्चा झाली आहे, काहीही कमी पडणार नाही असं पंकजांनी कौठळीत बोलतांना सांगितलं.

Web Title: Didn't lay a single brick when in power, now struggling to get credit: Pankaja Munde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.