पेट्रोल पंपावर दीड लाखांची डिझेल चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:27 AM2021-05-03T04:27:55+5:302021-05-03T04:27:55+5:30
केज : येथील कळंब रोडवर मागील महिन्यात सुरू झालेल्या कमल पेट्रोलियम या रमेश आडसकर यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर अज्ञात ...
केज : येथील कळंब रोडवर मागील महिन्यात सुरू झालेल्या कमल पेट्रोलियम या रमेश आडसकर यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत, १ लाख ४९ हजार १६७ रुपयांचे १,७०४ लीटर डिझेल चोरून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी केज पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
केज- कळंब राज्य रस्त्यावर आडसकर यांच्या मालकीचा पेट्रोल पंप मार्चमध्ये सुरू करण्यात आला. या पंपावर १ मे रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी टाकीमधून पाइपद्वारे डिझेल चोरी केल्याची घटना घडली. यावेळी वॉचमनला संशय आल्याने त्याने आवाज देताच, चोरटे १० टायरच्या ट्रकमधून डिझेल घेऊन पसार झाले. मात्र, काढलेल्या डिझेलपैकी पंपाच्या बाजूला असलेल्या बंधाऱ्याच्या जवळ ३५ लीटरचे ३४ कॅन व ६० लीटरचे ३ कॅन चोरांना नेता न आल्याने तिथेच राहिले. टाकीतून काढलेल्या ३,९१५ लीटरपैकी चोरांनी १,७०४ लीटर डिझेल चोरून नेले. मात्र, १,५०० लीटर डिझेल त्यांनी टाकीतून काढले. मात्र, त्यांना ते सर्व घेऊन जाता आले नाही. १ लाख ४९ हजार १६७ रुपयांच्या डिझेल चोरीप्रकरणी पंपाचे मॅनेजर गोविंद देशपांडे यांच्या फिर्यादीवरून केज पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
केजमध्ये डिझेल चोरणारी टोळी सक्रिय
केज तालुक्यात यापूर्वीही काही पंपावरून डिझेल चोरीला गेल्याच्या घटना घडल्या असून, याबाबत एखादी मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, याबाबत पोलिसांनी या नवीन रॅकेटचा शोध घेण्याची मागणी पेट्रोल पंप चालकांकडून होत आहे.