एकाचवेळी २५० कंटेनरचे लक्ष्मीपूजन; उसतोड मंजुरांच्या मुलांनी कष्टाने गावाची ओळख बदलली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2023 12:25 PM2023-11-13T12:25:07+5:302023-11-13T12:26:22+5:30

२५० कंटेनरचे गावात तर २०० कंटेनरचे देशभरात लक्ष्मीपूजन; सावंगी गावच्या उसतोड मंजुरांच्या मुलांकडे एकूण 450 कंटेनरची मालकी

Different Diwali; Simultaneous Lakshmi Pujan of 250 containers at time, sugarcane workers children changed the face of the village with hard work | एकाचवेळी २५० कंटेनरचे लक्ष्मीपूजन; उसतोड मंजुरांच्या मुलांनी कष्टाने गावाची ओळख बदलली

एकाचवेळी २५० कंटेनरचे लक्ष्मीपूजन; उसतोड मंजुरांच्या मुलांनी कष्टाने गावाची ओळख बदलली

- मधुकर सिरसट
केज (बीड):
 उसतोड मजुरांचा बीड जिल्हा म्हणून लागलेला कलंक पुसण्याचा विडा केज तालुक्यातील सांगवी (सारणी) येथील तरुणांनी उचलला असून या गावातील तरुणांकडे आज तब्बल 450 कंटेनरची मालकी आहे. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी त्यापैकी 250 कंटेनर गावात होते. याची सामूहिकरित्या पूजा हभप अर्जुन महाराज लाड, हभप प्रकाश महाराज साठे,सरपंच संजय केदार,आणि जेष्ठ नेते दत्ता धस यांच्या हस्ते रविवारी  सायंकाळी करण्यात आली. 150 कंटेनर माल वाहतुकीच्या निमीत्ताने देशाच्या विविध भागात असल्यामुळे त्यांनी आपापल्या सोयीप्रमाणे लक्ष्मीपूजन केले.

केज तालुक्यातील सांगवी (सारणी) हे गाव तसे अहमदपूर-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गालगत असलेले खेडे आहे. या गावची लोकसंख्या दोन ते अडीच हजारांच्या आसपास आहे. 1995 ते 2000 या दरम्यान गावातील काही तरूण विविध प्रकारच्या गाड्यांवर क्लीनर म्हणून काम करीत होते. त्यातूनच 2001 साली गावातील 15 युवक चालक बनले. दरम्यान, काहींनी स्वतःच्या गाड्या घेतल्या तर काहींनी दुसऱ्यांच्या गाडीवर  चालक म्हणून काम करु केले. छत्रपती संभाजीनगर येथील पुष्पक ट्रान्सपोर्टमध्ये अनेकजण चालक म्हणून कामाला लागले.

2015 साली पहिला कंटेनर, आज 450 
रामेश्वर केदार हे 2015 साली सांगवीतील पहिले कंटेनर मालक झाले. त्यानंतर गावात कंटेनर घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली. आज सांगवीतील उसतोड मंजुरांच्या मुलांकडे एकूण 450 कंटेनरची मालकी असल्याची माहिती जेष्ठ नेते दत्ता धस यांनी दिली.

सालगड्याचा मुलगा 20 कंटेनरचा मालक
गावातील बाबुराव केदार हे निरक्षर आहेत.त्यांचे वडील गावातच सालगडी म्हणून काम करायचे. शिक्षणासाठी पैसे नव्हते, तुटपुंज्या शेतीत कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नव्हता त्यामुळे कंटेनरवर आधी क्लीनर आणि नंतर चालक झाले. त्यानंतर स्वतः या व्यवसायात प्रवेश केला. एका कंटेनरने सुरुवात करत आज तब्बल 20 कंटेनर त्यांच्या मालकीचे आहेत. बाबुराव केदार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. तर 20 चालक, 20 क्लीनर मिळून 40 कामगार कामाला असल्याची माहिती केदार यांनी दिली. 

निर्व्यसनीपणामुळेच प्रगती
सांगवी गावात 450 कंटेनरवरील चालक आणि क्लीनर काम करणारे युवक हे निर्व्यसनी आहेत. निर्व्यसनी राहणे हेच आमच्या प्रगतीचे व विकासाचे खरे गुपित असल्याचे अप्पासाहेब धस यांनी सांगितले. 

दरदिवशी कोटीवर उलाढाल
गावातील 20 ते 25 मालकांचे मिळून एकूण 450 कंटेनर आहेत. त्यासाठी 22 ते 25 रोडलाईन्सची नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी नाशिक येथे 2, पुणे येथे 3, छत्रपती संभाजीनगर येथे 1 तर उर्वरित 19 रोडलाईन्सचे कार्यालय सांगवी (सारणी) येथील फाट्यावरच आहेत. यांची सर्वांची वर्षभराची उलाढाल एक ते सव्वा कोटीची होते. 
- संजय केदार, सरपंच

रात्री उशीरापर्यंत चालली पूजा
भगवान बाबा सोशल फौंडेशन आणि सांगवी ग्रामपंचायतीच्यावतीने रविवारी रात्री गावातील 25 ट्रान्सपोर्ट मालकांचा व नव्याने कंटेनर खरेदी केलेल्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी 250 कंटेनरची गावाबाहेरील एका शेतात हभप अर्जुन महाराज लाड, हभप प्रकाश महाराज साठे, सरपंच संजय केदार आणि जेष्ठ नेते दत्ता धस यांच्या हस्ते सामूहिक लक्ष्मीपूजन करण्यात आले.

Web Title: Different Diwali; Simultaneous Lakshmi Pujan of 250 containers at time, sugarcane workers children changed the face of the village with hard work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.