बीडच्या चिमुकल्यांच्या नाशिक, पुण्यात कानाची अवघड शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:34 AM2021-07-30T04:34:47+5:302021-07-30T04:34:47+5:30
बीडमध्ये पहिल्यांदाच लाभ : तपासणी शिबिरात आजार समोर बीड : राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत केलेल्या आरोग्य तपासणीत जिल्ह्यातील दोन ...
बीडमध्ये पहिल्यांदाच लाभ : तपासणी शिबिरात आजार समोर
बीड : राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत केलेल्या आरोग्य तपासणीत जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांना कानाचा आजार असल्याचे समजले. या दोघांनाही तात्काळ नाशिक व पुणे येथील रुग्णालयात दाखल करून कानाची अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. बीडमधील विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला आहे. आरोग्य विभागाने केलेल्या पाठपुराव्याने या मुलांना लाभ मिळाला आहे.
जिल्ह्यात आरबीएसकेचे ३९ पथके आहेत. अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांची पथकाकडून तपासणी केली जाते. परंतु, मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे या तपासणी थांबल्या असून सर्व यंत्रणा कोरोनातील उपाययोजना व उपचारासाठी घेण्यात आली आहे. यापूर्वीच्या तपासणीत आढळलेल्या गेवराई व परळी तालुक्यातील दोन मुलांना कानाचा आजार असल्याचे समोर आले होते. या दोघांनाही तात्काळ पाठपुरावा करून नाशिक व पुणे येथील रुग्णालयात दाखल करून त्यांची अवघड शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या शस्त्रक्रियेसाठी आरोग्य विभागाकडून ५ लाख २० हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. सध्या या दोन्ही बालकांची प्रकृती स्थिर आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब ढाकणे, समन्वयक आर. के. तांगडे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.