पायी चालणे अवघड, त्यात अवजड वाहनांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 05:02 AM2021-02-18T05:02:06+5:302021-02-18T05:02:06+5:30
माजलगाव : अतिक्रमणे व हातगाड्यांमुळे असेच चालणे अवघड झालेले असतांना शहरातून अवजड तसेच उसाची वाहने जात असल्याने दिवसभर ट्रॅफिक ...
माजलगाव : अतिक्रमणे व हातगाड्यांमुळे असेच चालणे अवघड झालेले असतांना शहरातून अवजड तसेच उसाची वाहने जात असल्याने दिवसभर ट्रॅफिक जामचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघाताला निमंत्रण मिळत असताना शहर पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचे पहावयास मिळत आहे.
माजलगाव शहरातील नागरिकांना शहरात कोठेही जायचे झाल्यास त्यांना केवळ एकच मुख्य रस्ता आहे. या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे असून जागोजागी हातगाडे लावण्यात येतात. यामुळे या रस्त्यावर साधे चालणेही अवघड झाले आहे तर वाहने चालवणे तर जिकिरीचे ठरत आहे. शहराला बायपास असताना व अतिक्रमणांमुळे चालणे अवघड झाले असताना अवजड आणि उसाची वाहने मोठ्या प्रमाणावर जात आहेत. उसाच्या डबल ट्रॉली जोडून बिनधास्तपणे ट्रॅक्टर चालविले जात असल्याने अपघातांची संख्या वाढली आहे. ही वाहने शहरातून जात असताना पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. या मुख्य रस्त्यावरील ४-५ चौकात एकही वाहतूक पोलीस दिसून येत नाही. सध्या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह महिला पुरूषांचा मुख्य रस्त्यावर वावर वाढला असून त्यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक पोलीस असताना ते केवळ अवैध प्रवासी वाहनांच्या पाठीमागे फिरताना दिसतात. अतिक्रमणे व अवजड वाहनांमुळे नागरिकांना त्रास होताना पोलिसांना याचे काहीच घेणे देणे राहिलेले दिसत नाही.
फलक नावालाच
शहर पोलिसांनी शहरात येणाऱ्या दोन्ही बाजूने शहरात अवजड व उसाची वाहने आणू नयेत. आणल्यास कारवाई करण्यात येईल असे फलक लावले आहेत. हे फलक लावलेले असताना अवजड व उसाची वाहने सर्रास शहरातून येत असल्याने लावलेले फलक केवळ नावालाच असल्याचे दिसून येत आहे.
कारवाई करणार
शहरात जागोजागी आम्ही फलक लावून वाहने शहरात आणू नये असे आवाहन केले आहे. जर अवजड व उसाची वाहने येत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
- धनंजय फराटे , पोलीस निरीक्षक ,शहर पोलीस ठाणे, माजलगाव