'झेडपी'च्या खाकीत शिकलेला दिलीप आता चमकणार फौजदाराच्या 'वर्दीत'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 05:51 PM2020-03-19T17:51:19+5:302020-03-19T17:54:23+5:30
आंबेजोगाई तालुक्यातील बाभळगाव या छोट्याशा गावातील रहिवाशी
अंबाजोगाई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या २०१८ च्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत दिलीप विलास सोनवणे या युवकाने एनटी ( ड ) प्रवर्गातून राज्यात प्रथम येत बाजी मारली आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकलेल्या दिपकने जिद्द व आत्मविश्वासाच्या बळावर मिळवलेल्या या यशाने बीड जिल्हावासीयांची मान राज्याच्या नकाशावर उंचावली आहे.
दिलीप विलास सोनवणे हा आंबेजोगाई तालुक्यातील बाभळगाव या छोट्याशा गावातील रहिवाशी आहे. त्याचे वडील मार्केट कमिटीत असून आई गृहिणी आहे. तो येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचा विद्यार्थी आहे. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्याची वाट धरली. येथे त्याने प्रचंड मेहनत करून जिद्दीच्या बळावर २०१८ साली घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या परीक्षेत परीक्षेत घवघवीत यश मिळवले. अत्यंत कठीण परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण करणाऱ्या दीपकने राज्यात भटक्या जमाती (ड) या प्रवर्गातून राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. त्याच्या या यशाने बाभळगावकरांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच परळी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रा. डॉ.बिभीषण फड, सीआयडी पोलिस अधीक्षक लता फड, डॉ. सूर्यकांत मुंडे, माजी सभापती शिवहार भताने, गटशिक्षणाधिकारी गणेश गिरी, दीपक तांदळे, साहेबराव फड, प्रा.बिभिषण चाटे, प्रा.आशा चाटे, शिक्षक प्रदीप चाटे आदींनी त्याचे स्वागत केले आहे.
दिलीप लहानपणापासूनच अत्यंत अभ्यासू व प्रामाणिक विद्यार्थी होता. प्रत्येक विषय समजून घेण्याकडे त्याचा कल असे. त्याच्या यशाने आमच्या शाळेचा आनंद द्विगुणीत केला आहे.
- शिवहार भताने, मार्गदर्शक शिक्षक