दिंद्रूडमध्ये भावाविरुद्ध भाऊ, तर मोह्यात दिराविरुद्ध भावजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:28 AM2021-01-13T05:28:56+5:302021-01-13T05:28:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : बीड जिल्ह्यात १२९ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. पैकी १८ ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्या असून, आता ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड जिल्ह्यात १२९ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. पैकी १८ ग्रामपंचायत बिनविरोध निघाल्या असून, आता १११ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी ४१३ प्रभागांसाठी २,११८ उमेदवार निवडणुकीत उतरले आहेत.
माजलगाव तालुक्यातील दिंद्रूड ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन ग्रामविकास आणि जनसेवा ग्रामविकास हे दोन पॅनल आमने-सामने आहेत. मात्र, केवळ चार सहकारी सोबत घेत दिंद्रूड ग्रामविकास आघाडी या तिसऱ्या पॅनलनेही या निवडणुकीत दांडगी उडी घेतली आहे. परिवर्तन ग्रामविकास पॅनलप्रमुख दिलीप हरिनाथ कोमटवार यांच्याविरुद्ध त्याच प्रभागात त्यांचे ज्येष्ठ बंधू अशोक कोमटवार निवडणूक लढवत आहेत. दोन सख्खे भाऊ परस्परविरोधी निवडणूक लढवत असल्याने केवळ याच प्रभागाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. दिंद्रूड ग्रामपंचायत ही माजलगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेली ग्रामपंचायत असून, राजकीयदृष्ट्याही महत्त्वाची समजली जाते.
परळी तालुक्यात सहा गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी सुरू. वंजारवाडी ही ग्रामपंचायत बिनविरोध निघाली. रेवलीत ९ पैकी ८ जागा बिनविरोध निघाल्या. इथे एका जागेसाठी निवडणूक होत आहे. परळी तालुक्यातील मोहा येथे दीरविरुद्ध भावजय, अशी लढत होत आहे. मदन वाघमारे यांच्या विरोधात त्यांची भावजय छाया वैजनाथ वाघमारे या निवडणूक लढवीत आहेत. या लढतीकडे संपूर्ण परळी तालुक्याचे लक्ष लागले आहे.