आंदोलकांवर लाठीचार्जचा निषेध; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 12:14 PM2023-09-06T12:14:33+5:302023-09-06T12:24:21+5:30
आंदोलकांनी तिरडी खांद्यावर घेऊन सरकार विरोधात केली जोरदार घोषणाबाजी
दिंद्रुड (बीड): जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ दिंद्रुड येथे आज सकाळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रतीकात्मक तिरडी खांद्यावर घेत अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
आज सकाळी दिंद्रुड येथील छत्रपती संभाजी महाराज चौकातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी तिरडीला चपलेचा हार, कपाळाला एक रुपया, तिरडीवर गुलाल टाकून शासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रतीकात्मक अंत्ययात्रा अखेर स्मशानभूमीत नेण्यात आली. येथे मराठा समाजावर झालेल्या अन्यायाविरोधात प्रचंड रोष मराठा समाजातील प्रतिनिधींनी व्यक्त केला.
तसेच जमीयत उलामा हिंद या मुस्लिम संघटनेचे मौलाना फारुख पठाण यांनी मराठा समाज बांधवांना आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी साद घातली. तसेच मराठा समाजाला 16 टक्के तर मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याची सरकारने केलेली घोषणा पूर्णत्वास नेण्याची यावेळी मागणी केली. आतापर्यंत शांततेत केलेल्या आंदोलनाचे फळ म्हणून आमच्या महिला भगिनींवर झालेला हल्ला हा घृणास्पद आहे. लोकशाही मार्गाने कायद्याच्या चौकटीत राहून आता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिंद्रुड व पंचक्रोशीतील नवयुवकांनी या आंदोलनातून दिला.