शिक्षण संस्थाचालकाने लॉकडाऊनच्या काळात केला मत्स्य व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:30 AM2021-04-03T04:30:20+5:302021-04-03T04:30:20+5:30
शाळा बंद असल्याने उत्पन्नाचा मार्ग शोधला पुरुषोत्तम करवा माजलगाव : मागील वर्षभराच्या काळात कोरोनामुळे लॉकडाऊन पडल्याने आपली चालु असलेली ...
शाळा बंद असल्याने उत्पन्नाचा मार्ग शोधला
पुरुषोत्तम करवा
माजलगाव : मागील वर्षभराच्या काळात कोरोनामुळे लॉकडाऊन पडल्याने आपली चालु असलेली इंग्लिश स्कूल बंद असल्याने जगायचे कसे, असा प्रश्न पडला होता. शेतातील शेततळ्यावर असलेली बाग कमी पाण्यामुळे मोडली. त्यामुळे शेततळ्यात मस्त्यबीज आणून सोडले व मासे विक्रीतून आठ महिन्यात खर्च वजा जाता दोन लाख रुपयांचे उत्पन्न संस्थाचालकाने मिळवले.
मागील वर्षभराच्या काळात देशात कोरोनामुळे अनेक व्यवसाय अडचणीत सापडले होते. लॉकडाऊन व कोरोना संसर्गामुळे शाळा बंद करण्यात आल्या. माजलगाव तालुक्यातील उमरी येथील ज्ञानेश्वर भागवतराव घायतिडक यांनी पाच वर्षांपूर्वी पाचवीपर्यंत इंग्लिश स्कूल चालू केली. या गावच्या परिसरातील विविध गावचे मिळून १०५ विद्यार्थी या शिक्षण घेत होते. तर या ठिकाणी सात कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. चांगल्या पद्धतीने चालत असलेली शाळा लॉकडाऊन व कोरोनामुळे शाळा बंद ठेवल्याने संस्थाचालकावर उपासमारीची वेळ आली.
होणारा खर्च भरून कसा काढायचा, असा प्रश्न होता. संस्थाचालक ज्ञानेश्वर घायतिडक यांची गावालगतच सहा एकर शेती असून, या शेतीत १०० बाय १०० आकाराचे शेततळे उभारले होते. या शेततळ्यावर दीड एकर डाळिंब होते; परंतु पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने या शेतकऱ्याने ही बाग मोडली. नंतर या शेततळ्यात मत्स्यबीज सोडण्याचा सल्ला याच गावातील परसराम माने यांनी दिल्यावरून आठ महिन्यांपूर्वी पाच हजार मत्स्यबीज या शेततळ्यात आणून सोडले. त्यानंतर या ठिकाणी एक ते दोन किलो वजनाचे मासे याठिकाणी तयार झाले. याठिकाणी कतला, रोहा, सुपर, राहु या जातीच्या माशाला १०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. यातून या संस्थाचालक शेतकऱ्याने खर्च वजा जाता दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले.
शैक्षणिक संस्था चालवताना सुरुवातीला मोठ्या प्रमाणात खर्च करूनदेखील दर महिन्याला ६५ ते ७० हजार रुपये खर्च होतो. हे करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते; परंतु या मत्स्य व्यवसायात कसलीही झंझट नसल्याने उत्पन्नही चांगले मिळाले.
---ज्ञानेश्वर घायतिडक , संस्थाचालक तथा शेतकरी.
===Photopath===
020421\purusttam karva_img-20210402-wa0065_14.jpg~020421\purusttam karva_img-20210402-wa0061_14.jpg