दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र तालुकास्तरावर मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:11 AM2021-09-02T05:11:36+5:302021-09-02T05:11:36+5:30
आष्टी: दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून त्यांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देण्याचे काम सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून सुरू आहे. मात्र, जिल्ह्याच्या ...
आष्टी: दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून त्यांना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देण्याचे काम सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून सुरू आहे. मात्र, जिल्ह्याच्या काेनाकोपऱ्यातून दिव्यांग विशेषतः अंध, मंतिमंद व बहुविकलांग व्यक्तींना जिल्ह्याच्या ठिकाणी दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र घेण्यासाठी ये-जा करणे खूपच त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे दिव्यांग प्रमाणपत्र देणारे बोर्ड तालुकास्तरावर कार्यान्वित करावे. उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयातून दिव्यांग व्यक्तींना आवश्यक प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा मिळावी, अशी मागणी माजी आ. अमरसिंह पंडित यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली आहे. याबाबत कार्यवाहीचे निर्देश दोन्ही मंत्र्यांनी दिले आहेत. या दिव्यांग हितार्थ मागणीला शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या बीड शाखेने पाठिंबा दिल्याची माहिती बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड यांनी दिली. तालुकास्तरावर दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र देणारे बोर्ड कार्यान्वित झाल्यास दिव्यांग बंधू-भगिनींनी भविष्यात जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज लागणार नाही. यासाठी शासन पातळीवर शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना पाठपुरावा करणार असल्याचे संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष महादेव सरवदे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र लाड, इंद्रजित डांगे, मधुकर अंबाड, सौदागर कुर्हे, नंदकुमार मोरे, पुंडलिक पाटील, आर. पी. शिंदे, बाळासाहेब सोनसळे, दत्तात्रय गाडेकर, बाळासाहेब कांबळे, शेषराव सानप, संजीवनी गायकवाड, वैशाली कुलकर्णी, आशा बारगजे, आदींनी केले आहे.