दिव्यांग निधीचे पाच वर्षांपासून वाटपच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:30 AM2021-05-22T04:30:39+5:302021-05-22T04:30:39+5:30
माजलगाव : ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांगांना ५ टक्के निधी तात्काळ वाटपाचे आदेश देऊनही अनेक ग्रामसेवकांनी निधी वाटप केला नाही. तरीही ...
माजलगाव : ग्रामपंचायत हद्दीतील दिव्यांगांना ५ टक्के निधी तात्काळ वाटपाचे आदेश देऊनही अनेक ग्रामसेवकांनी निधी वाटप केला नाही. तरीही एकाही ग्रामसेवकावर कारवाई केली नाही. याउलट त्यांना अभय देण्याचे काम येथील गटविकास अधिकारी करीत असल्याचा आरोप दिव्यांगांकडून केला जात आहे.
माजलगाव तालुक्यात ९१ ग्रामपंचायती आहेत. या पंचायतींच्या हद्दीत एकूण १ हजार २७३ दिव्यांग आहेत. ग्रामपंचायतीच्या नळपट्टी, घरपट्टी व इतर उत्पन्नाच्या स्रोतांमधून ५ टक्के निधी बाजूला काढून आपल्या गावातील दिव्यांगांना वाटप करण्यात यावा, असा न्यायालयाचा आदेश आहे. असे असताना ९१ पैकी काही ठराविक ग्रामपंचायतींनीच दिव्यांगांना निधीचे वाटप केले. मात्र, बहुतांश पंचायतींनी वाटप केलेले नाही. यासाठी दिव्यांगांसाठी झटणाऱ्या संघटनांनी व प्रहार संघटनेने निधी वाटप न करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करावी. यासाठी ६ एप्रिल रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यानंतर शासनाने सन २०१६ पासून निधी वाटपाचे आदेश दिले होते; परंतु त्याचे पालन होत नसल्याने गटविकास अधिकारी प्रज्ञा माने यांनी सर्व ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी यांना ३१ मार्च रोजी पत्र लिहून आपणास दिव्यांग निधी वाटपाचे व अहवाल सादर करण्याचे वारंवार तोंडी व लेखी सांगूनही आपण अहवाल सादर करीत नाही. वरिष्ठांचे आदेशाचे पालन करीत नाही ही अतिशय गंभीर बाब आहे, त्यामुळे या शेवटच्या पत्रानुसार आपण निधी तत्काळ वाटप करावा. कोणत्या बाबींवर खर्च केला याची लाभार्थीनिहाय यादी सादर करावी. या कामी विलंब केल्यास प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
--------
आम्ही एप्रिल महिन्यात दिव्यांगांचा निधी तत्काळ वाटप न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता; परंतु येथील गटविकास अधिकाऱ्यांनी पत्र काढूनही अनेक ग्रामसेवकांनी ते वाटप केलेले नाही. यामुळे दिव्यांग निधी वाटप न करणाऱ्या ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत. नसता आंदोलन करण्यात येईल.
-गोपाळ पैंजणे, प्रहार तालुकाध्यक्ष.
-----
ज्या ग्रामसेवकांनी अद्याप दिव्यांगांचा निधी वाटपच केला नाही अशा ग्रामसेवकांवर कारवाई करणारा अहवाल आम्ही वरिष्ठांना पाठविणार आहोत.
-- रामचंद्र रोडेवाड, विस्तार अधिकारी.