दिव्यांग अधिकारी, कर्मचारी एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 12:22 AM2019-08-24T00:22:02+5:302019-08-24T00:22:44+5:30
राज्यातील दिव्यांग संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान योजना केंद्र शासनाने सर्व सामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणे लागू केली आहे.
बीड : राज्यातील दिव्यांग संवर्गातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी परिभाषित अंशदान योजना केंद्र शासनाने सर्व सामान्य कर्मचाऱ्यांप्रमाणे लागू केली आहे. परंतू सदरची योजना ही दिव्यांग कर्मचा-यांच्या हक्कांवर गदा आणणारी व अन्याय करणारी आहे. या योजनेचा निवृत्तीनंतर कोणत्याही कर्मचार्यांना कसलाही लाभ प्राप्त होणार नाही. त्यामुळे शासनाच्या या परिभाषित योजनेचा बिमोड करण्यासाठी सक्र ीय लढा देण्याचा निर्धार चर्चासत्रात करण्यात आला.
कायम निवृत्तीवेतन योजनेच्या लाभ प्राप्तीसाठी महाराष्ट्र राज्य दिव्यांग अधिकारी कर्मचारी संघटनेने राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
येथील पंचायत समिती सभागृहात झालेल्या या चर्चासत्राचे प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ विवेकानंद सानप तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य अपंग कर्मचारी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले उपस्थित होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष साईनाथ पवार यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक जिल्हा शाखेचे कोषाध्यक्ष पी. डी. उनवणे यांनी केले. सूत्रसंचालन कुमारी सुरेखा खेडकर यांनी केले. चर्चासत्राच्या आयोजनासाठी राज्य समन्वयक विजय कागदे, जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष आजिनाथ हाडोळे, जिल्हा सचिव बप्पासाहेब ढवळे,गोविंद वायकर आदींनी परिश्रम घेतले.