महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवरही विसंवाद; तीनही पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या वरिष्ठांकडे तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2022 04:55 PM2022-04-04T16:55:38+5:302022-04-04T16:57:34+5:30
राज्यात महाआघाडीचेच सरकार असले तरी कामे होत नसल्याची तक्रार कॉंग्रेसच्या २७ आमदारांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे नुकतीच केली आहे. अशाच तक्रारी जिल्ह्यातदेखील आहेत.
- अनिल लगड
बीड : राज्यात भाजपला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले; परंतु सत्तास्थापनेपासून राज्यात तिन्ही पक्षांत अनेक कारणांवरून मतभेद दिसून येत आहेत. असेच चित्र बीड जिल्ह्यात जिल्हापातळीपासून गावपातळीपर्यंत पाहायला मिळत आहेत. पालकमंत्री धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आहेत. राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्याही जास्त आहे. यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीचेच वर्चस्व दिसून येत आहे. महाविकास आघाडीत सत्तेत असलेल्या शिवसेनेला कुठेच स्थान मिळत नाही, असा आरोप शिवसेनेचे पदाधिकारी जाहीरपणे करताना आहेत; तर जिल्ह्यात काँग्रेसकडे राज्यसभेत रजनी पाटील यांच्या रूपाने खासदारपद आहे. तरीही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांत स्थानिक पातळीवर नाराजीचे चित्र आहे. फक्त सत्ता आपल्याही पक्षाची आहे, एवढेच समाधान मानून ‘तुझे माझे जमेना अन् तुझ्यावाचून करमेना,’ असेच राजकीय चित्र जिल्ह्यात आघाडीत दिसत आहे.
राज्यात महाआघाडीचेच सरकार असले तरी कामे होत नसल्याची तक्रार कॉंग्रेसच्या २७ आमदारांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे नुकतीच केली आहे. अशाच तक्रारी जिल्ह्यातदेखील आहेत. पाच नगरपंचायतींच्या निवडणुकीत कुठेही महाविकास आघाडी एकत्र लढली नाही. बीड शहरात शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर या काका-पुतण्यांतील आरोप-प्रत्यारोप जाहीरपणे पाहायला मिळाले. माजलगावमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांचा सवतासुभा पाहायला मिळत आहे. गेवराईत राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांचाच गजर सुरू आहे. येथेही काँग्रेस, सेनेत अस्वस्थता दिसत आहे. आष्टी-पाटोद्यात राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे सत्तेत असूनही त्यांना काँग्रेस, सेनेचे पाठबळ दिसत नसल्याचे चित्र आहे. असे असले तरी निधी मिळविण्यात व कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींना कसरत करावी लागत आहे.
तक्रारी कोणाच्या काय?
काँग्रेस: राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे हे पालकमंत्री आहेत. त्यांनी आपल्याच मतदासंघात विकासाचा निधी वळविला आहे. यामुळे पालकमंत्र्यांकडून अन्याय होत आहे. आता त्यांचे पोट भरलेय. त्यांनी मन मोठं करून काँग्रेस, सेनेच्या सेवेसाठी निधी द्यावा. सत्तेत काँग्रेसचाही वाटा आहे; परंतु आमच्या कार्यकर्त्याला स्थानिक पातळीवर कामे करताना दुजाभाव केला जातो. यामुळे कार्यकर्त्यांत नाराजी आहे, असा आरोप काँग्रेसकडून केला जातो.
राष्ट्रवादी: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या जादूमुळे काँग्रेस सत्तेत आली आहे. सत्ता नसली की काय होते हे काँग्रेस, राष्ट्रवादीने पाहिले आहे. रस्ते, पाणी या प्रश्नांवर कोणतेही मतभेद नाहीत; परंतु स्थानिक पातळीवरील सत्तासंघर्षाचा प्रश्न आहे. कार्यकर्त्यांच्या ‘इगो’चा प्रश्न आहे. जिल्ह्यात सर्वसामान्यांचे प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत; परंतु सर्वसामान्यांच्या प्रश्नाला बगल दिली जात आहे.
शिवसेना: काँग्रेसच्या आमदारांची नाराजी काँग्रेसच्या मंत्र्यांवर आहे. आघाडीवर किंवा मुख्यमंत्र्यांबाबत नाही. सत्ता स्थापन करताना जो शिवसेनेचा हिस्सा आहे, त्याप्रमाणे कमिट्या व निधीचा वाटा मिळाला पाहिजे; याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त केली आहे, असे सेना पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
सत्ताधाऱ्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रारी
एकंदरीत जिल्ह्यात सत्तेत राष्ट्रवादीचा मोठा वाटा आहे. यामुळे जे सूत्र आहे, त्या सूत्राप्रमाणे सर्वच ठिकाणी सेना, काँग्रेसला वाटा मिळाला पाहिजे, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. याबाबत प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केलेल्या आहेत. वरिष्ठ काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचे आहे.