बीडमध्ये आणखी सहा जाणांना डिस्चार्ज; आतापर्यंत ४० कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 07:51 PM2020-06-02T19:51:27+5:302020-06-02T19:52:10+5:30
सध्या 22 जणांवर उपचार सुरू
बीड : जिल्ह्यात मागील आठवडाभरात कोरोनामुक्तीचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मंगळवारी आणखी सहा जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ४० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या २२ रुग्ण उपचार घेत आहेत. पुण्याला गेलेले सर्वच रुग्ण सुखरूप घरी परतले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ६३ कोरोनाबाधित आढळले आहेत. पैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत बीडमध्ये उपचार घेणाºयाही ३४ रुग्णांना बरे करून घरी पाठविण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने आलेल्या रुग्णांवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात मोठी भूमिका बजावली आहे. सध्या जिल्ह्यात २२ रुग्ण अद्यापही विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली टिम योग्य काम करीत आहेत.
दरम्यान, बुधवारी घरी तिघांना घरी सोडले. यामध्ये धारूर तालुक्यातील कुंडी, बीड शहर व वडवणी शहरातील तिघे असल्याचे शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी सांगितले तर पुण्याला गेलेल्या तीन रुग्णांनाही सुटी झाल्याचे आष्टीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोठूळे यांनी सांगितले. आता सर्वच रुग्णांना सुटी झाल्याचे पाटन सांगवी येथील रुग्णांच्या नातेवाईकांनी ‘लोकमत’ला सांगितले.