गुरूंच्या विरहाने शिष्याने सोडले प्राण; समाधीस्थळीच घेतला अखेरचा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 03:41 PM2021-09-11T15:41:38+5:302021-09-11T15:44:44+5:30
महाराजांचा समाधी सोहळा उरकल्यानंतर काही वेळातच समाधिस्थळी विलासअप्पा शेटे यांनी जगाचा निरोप घेतला.
माजलगाव : येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे पूर्व मठाधिपती लिं.सद्गुरू तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी माजलगावकर यांचे सेवेकरी आणि मठाचे निस्वार्थी सेवक विलास विठ्ठलअप्पा शेटे (वय ४५) यांचे आपल्या गुरूचा विरह सहन न झाल्याने हृदयविकाराने दुपारी १.४० वाजता निधन झाले. लिं. माजलगावकर महाराजांचा समाधी सोहळा उरकल्यानंतर काही वेळातच समाधिस्थळी विलासअप्पा शेटे यांनी जगाचा निरोप घेतला.
काल दुपारी १ वाजता माजलगाव मठाचे मठाधिपती सद्गुरू श्रीगुरू तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महाराज शिवचरणी लीन झाले. त्यांचा समाधी सोहळा आज सकाळी ११ वाजता माजलगाव मठामध्ये करण्यात आला. हा समाधी सोहळा पार पडल्यानंतर विलासअप्पा शेटे यांच्या छातीत त्रास सुरू झाला. तातडीने त्यांना येथील खाजगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले असता येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी समाधीस्थळीच दम सोडला असल्याचे भाविक सांगत होते.
गेल्या अनेक वर्षापासुन विलासअप्पा शेटे कुठल्याही अपेक्षेविना निस्वार्थ भावनेने माजलगांव मठाची सेवा करीत होते. त्यांची काम करण्याची हातोटी आणि विलक्षण चपळता माजलगावकर महाराजांना भावल्याने अगदीच कमी काळात ते त्यांचे विश्वासू सेवेकरी झाले. आज त्यांच्या अशा अचानक जाण्याने सम्रग वीरशैव समाज पुन्हा एकदा शोकसागरात बुडाला असून केवळ दोनच दिवसात हा दुसरा मोठा धक्का या समाजाला सहन करावा लागला आहे.