चर्चा निकालाची; पंकजा मुंडेंना परळी, आष्टी, तर सोनवणेंना बीड, गेवराईमधून "लीड"चा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 11:42 AM2024-06-01T11:42:14+5:302024-06-01T11:43:23+5:30

वाढलेला मतदानाचा टक्का कोणाला देणार धक्का?

Discussion of Loksabha results 2024; 'Lead' confidence from Parli, Ashti to Pankaja Munde; Beed, Gevarai to Bajrang Sonawane | चर्चा निकालाची; पंकजा मुंडेंना परळी, आष्टी, तर सोनवणेंना बीड, गेवराईमधून "लीड"चा विश्वास

चर्चा निकालाची; पंकजा मुंडेंना परळी, आष्टी, तर सोनवणेंना बीड, गेवराईमधून "लीड"चा विश्वास

- सोमनाथ खताळ

बीड : लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. यावेळी जातीय राजकारण झाले. तसेच मतदानाचा टक्काही वाढला. हाच वाढलेला टक्का कोणाला धक्का देणार? हे मंगळवारी समजेलच. परंतु, महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना परळी आणि आष्टी मतदारसंघातून, तर महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांना बीड आणि गेवराई मतदारसंघातून लीड मिळेल, असा विश्वास आहे. त्यादृष्टीने दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांकडून दावे - प्रतिदावे करत आपलाच उमेदवार विजयी होणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सध्या गल्लीपासून शहरापर्यंत केवळ निकालाचीच चर्चा सुरू आहे.

बीड लोकसभेसाठी यावेळी तब्बल ४१ उमेदवार हे निवडणूक रिंगणात उतरले होते. यामध्ये महायुतीकडून भाजपच्या पंकजा मुंडे, महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजनकडून अशोक हिंगे यांचा समावेश होता. परंतु, खरी लढत ही मुंडे आणि सोनवणे यांच्यातच झाली. यावेळी पहिल्यांदाच निवडणुकीत जातीचा मुद्दा चर्चेत राहिला. अगदी गावातील कॉर्नर बैठकीपासून ते देशाच्या नेत्यापर्यंतच्या सभांमध्ये जातीचा मुद्दा निघाला होता. तसेच यावेळी मतदानाचा टक्काही पावणे चारने वाढला होता. या सर्व टक्केवारीचा अंदाज आणि जातीय समीकरणे जुळवून कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे - प्रतिदावे केले जात आहेत. आपलाच उमेदवार विजयी होणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. परंतु, कोणाचा दावा खरा ठरणार? हे ४ जून रोजी स्पष्ट हाेईल. सध्या तरी सगळीकडे निकालाचीच चर्चा सुरू आहे.

मुंडेंना कोणते मतदारसंघ तारणार?
पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघ बालेकिल्ला आहे. धनंजय मुंडे सोबत असल्याने पंकजा यांना याच मतदारसंघातून लीड मिळेल, अशी अपेक्षा आहे. तसेच आष्टी मतदारसंघातही भाजपचा मतदार मोठ्या संख्येने आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीतही डॉ. प्रीतम मुंडे यांना लीड ही आष्टीतून मिळाली होती. हे दोनच मतदारसंघ पंकजा मुंडे यांना मोठ्या प्रमाणात लीड देऊ शकतात. केज, गेवराई, माजलगाव हे त्यानंतर येतील. बीडमध्ये कमी लीड मिळेल, असे सांगण्यात येत आहे.

बजरंग सोनवणेंना बीड देणार आधार
२०१९च्या निवडणुकीत डॉ. प्रीतम मुंडे यांना सर्वांत कमी मते बीड मतदारसंघातून मिळाली होती. यावेळी जातीय राजकारण झाल्याने मुस्लीम, मराठा मतदार हे सोनवणेंच्या सोबत असतील. त्यामुळे बीड हे सोनवणेंना आधार देईल. यासोबतच माजलगाव, गेवराईमधूनही सोनवणेंना लीडची अपेक्षा आहे. होमपीच असलेल्या केजमध्ये कोणाला लीड मिळते? याकडेही लक्ष लागले आहे.

५ वाजेनंतर १३ टक्के मतदान
१३ मे रोजी सायंकाळी ५:०० वाजेनंतर मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळाले. सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत ५७ टक्के मतदान झाले होते. परंतु, त्यानंतर मात्र उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया चालली. त्यामुळे हा टक्का वाढून ७०च्या पुढे गेला. हेच वाढलेले मतदान कोणाला फायद्याचे आणि कोणाला तोट्याचे ठरणार? याचे गणित समर्थकांकडून जुळवली जात आहे. प्रत्येकजण दावा - प्रतिदावा करून आपल्या नेत्यावर विश्वास दाखवत आहे.

विधानसभानिहाय मतदानाची टक्केवारी
गेवराई ७१.४३
माजलगाव ७१.६१
बीड ६६.०९
आष्टी ७४.७९
केज ७०.३१
परळी ७१.३१
एकूण ७०.९२

Web Title: Discussion of Loksabha results 2024; 'Lead' confidence from Parli, Ashti to Pankaja Munde; Beed, Gevarai to Bajrang Sonawane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.