आजार की बाजार? गर्भपिशव्या काढण्याचे प्रकार पुन्हा वाढले; पाच वर्षांत ४,७१४ शस्त्रक्रिया
By सोमनाथ खताळ | Published: December 30, 2023 07:57 AM2023-12-30T07:57:07+5:302023-12-30T07:58:03+5:30
अवघ्या २३व्या वर्षीही काढली पिशवी
सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : महिलांच्या गर्भपिशव्या काढण्याचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. मागील पाच वर्षांत जिल्ह्यातील ४ हजार ७१४ महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यातील अडीच हजार पिशव्या या खासगी रुग्णालयात काढल्या आहेत. धक्कादायक म्हणजे अवघ्या २३ वय असलेल्या एका विवाहितेचीही शस्त्रक्रिया झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
२०१६ ते २०१८ या तीनच वर्षांत १०१ खासगी रुग्णालयांत तब्बल चार हजार ६०५ महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या होत्या. २०२० व २०२१ ला शस्त्रक्रियांचा आकडा निम्म्यावर आला. मात्र, दुर्लक्ष झाल्यामुळे २०२२मध्ये हा आकडा एक हजाराच्या वर पोहोचला आहे. ५५ टक्के खासगी रुग्णालये, ४४ टक्केशासकीय रुग्णालये.
‘लोकमत’मुळे प्रकरण उजेडात
‘लोकमत’ने हे प्रकरण उजेडात आणले. त्यानंतर २६ जून २०१९ ला चौकशीसाठी डॉ. गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली. सर्व महिलांशी संवाद, अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समितीने २७ ऑगस्ट २०१९ ला शासनाला अहवाल देत मार्गदर्शक सूचना सुचविल्या होत्या.
गर्भपिशवीला गाठ असणे, मासिक पाळीत जास्त दिवस जास्त प्रमाणात रक्तस्राव होणे, पिशवीच्या आतील भागाची अनियंत्रित वाढ होणे, पिशवी किंवा मुखाचा कॅन्सर या कारणांनी शस्त्रक्रिया केली जाते. याचे प्रमाण २५ ते ३०% असू शकते. सर्वांनाच शस्त्रक्रियेची गरज नाही. - डॉ. अशोक बडे, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड