ज्ञानदानाच्या पेशाला काळिमा; आरोग्य विभागाचा पेपर फोडणारे बीडमधील दोन शिक्षक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 12:03 PM2022-01-11T12:03:34+5:302022-01-11T12:08:13+5:30
शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कारवाई
बीड : आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात बीडमधील दोन शिक्षकांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर माध्यमांमधून याचे वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्यामुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी सोमवारी ही कारवाई केली. या प्रकरणात या दोघांचा कसा सहभाग होता ? हे मात्र समजू शकले नाही.
उद्धव प्रल्हाद नागरगोजे (जि. प. प्रा. शा. कुक्कडगाव, ता. बीड) व विजय नागरगोजे (जि.प.शाळा काकडहिरा, ता. बीड) अशी निलंबित केलेल्या दोन शिक्षकांची नावे आहेत. आरोग्य विभागाकडून गट क व ड पदासाठी परीक्षा घेण्यात आल्या होत्या. याच परीक्षेचा पेपर फुटला होता. यात आगोदरच डॉ. महेश बोटले, प्रशांत बडगिरे यासारख्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांसह राजकीय पदाधिकारी, न्यासा व इतर संस्थेचे लोकांना पुणे सायबर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याच प्रकरणाशी संबंधित उद्धव नागरगाेजे व विजय नागरगोजे या दोघांची नावे पुढे आली. पुणे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या. याचे वृत्त माध्यमांनी प्रकाशित केले. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली होती. याच वृत्तांमुळे शिक्षण विभागाची प्रतिमा मलीन केली म्हणून सीईओ अजित पवार यांनी या दोन्ही शिक्षकांनी निलंबित केले. या कारवाईने खळबळ उडाली असली तरी या शिक्षकांशी आणखी कोण संपर्कात होते, याचा तपासही पोलीस घेत आहेत. शिक्षण विभागातील आणखी कोणाचा त्यांच्याशी संपर्क होता का, याचा तपास लावण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.
उद्धव नागरगाेजे रजा टाकून फरार
कुक्कडगावचा शिक्षक उद्धव नागरगोजे याने ६ व ७ डिसेंबर रोजी किरकोळ रजा टाकली होती. रजा संपल्यावर ही तो परत आला नाही. ८ डिसेंबर पासून आजपर्यंत तो अनधिकृत गैरहजर राहिल्याचा अहवाल केंद्र प्रमुखांनी सीईओंकडे सादर केला. त्याच आदेशाला धरून त्याचे निलंबन झाले आहे. आरोग्य विभागाच्या पेपर फुटी प्रकरण समोर येताच हा शिक्षक फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे.