ऐन तारुण्यात भरकटली दिशा, जिल्हा कारागृहात ६० टक्के कैदी बेरोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:37 AM2021-08-19T04:37:05+5:302021-08-19T04:37:05+5:30
बीड : शिक्षण घेऊन करिअर घडविण्याच्या वयात अनेक जण जिल्हा कारागृहाच्या चार भिंतीआडच्या कोठडीत जीवन व्यतीत करीत आहेत. येथील ...
बीड : शिक्षण घेऊन करिअर घडविण्याच्या वयात अनेक जण जिल्हा कारागृहाच्या चार भिंतीआडच्या कोठडीत जीवन व्यतीत करीत आहेत. येथील जिल्हा कारागृहात ७० टक्के कैदी २० ते ३५ वयोगटातील असून, त्यातील ६० टक्के बेरोजगार आहेत.
काेरोना विषाणू संसर्गामुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला. यास गुन्हेगारी वर्तुळही अपवाद ठरले नाही. लॉकडाऊनमुळे लोकांना घराबाहेर पडणे मुश्कील बनले. त्यातून अनेक जण नैराश्येच्या खाईत लोटले गेले. नोकरी, व्यवसाय नसल्याने अनेक जण बेचैन आहेत. पैशांची चणचण, व्यसनाधीनता, वाईट प्रवृत्तीच्या लोकांसोबतची संगत यामुळे ऐन तारुण्यात काही जण गुन्हेगारीच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. खून, बलात्कार, चोरी, जबरी चोरी, दरोडा अशा सगळ्या गुन्ह्यांत तरुणांचा वाढता सहभाग चिंताजनक आहे. जिल्हा कारागृहात गंभीर गुन्ह्यांच्या आरोपाखाली येणाऱ्या तरुणांचे समुपदेशन केले जाते. त्यांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी कारागृह प्रशासनाचे प्रयत्न असतात, अशी माहिती कारागृह अधीक्षक विलास भोईटे यांनी दिली. सध्या जिल्हा कारागृहात २९३ कैदी आहेत. कोरोनाच्या अनुषंगाने मुलींच्या शासकीय वसतिगृहात तात्पुरते कारागृह उभारल्याचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी महादेव पवार यांनी सांगितले.
...
कोणते कैदी किती (टक्क्यांत)
शासकीय ०१
नोकरदार
व्यापारी ००
शेतकरी २२
शेतमजूर १७
बेरोजगार ६०
....
२० ते ३५ वयोगटाचे
७० टक्के कैदी
....
कारागृहात कोणत्या गुन्ह्याचे किती कैदी
गुन्हे कैदी (टक्क्यांत)
चोरी व घरफोडी १६
महिला अत्याचार ७२
खून १४४
खुनाचा प्रयत्न २४
हुंड्यासाठी छळ ०३
मोक्का ०४
अनैसर्गिक अत्याचार ०१
शासकीय कामात अडथळा ०१
......