गृहविलगीकरणातील रुग्णांचा कचरा सार्वजनिक घंटागाडीतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:30 AM2021-04-14T04:30:44+5:302021-04-14T04:30:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन आणि आरोग्य विभाग हतबल झाला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासन आणि आरोग्य विभाग हतबल झाला आहे. खाटा अपुऱ्या पडत असल्याने लक्षणे नसलेल्या बाधित रुग्णांना होम आयसोलेट दिले जात आहे; परंतु त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसते. त्यांच्या घरातून निघणारा कचरा स्वतंत्र न ठेवता सार्वजनिक घंटागाडीत टाकला जात आहे. यात नागरिकही गाफील असून, पालिकेचीही स्वतंत्र व्यवस्था नसल्याचे दिसते. केवळ कंटेनमेंट झोनमधील कचरा स्वतंत्र जमा केला जात आहे.
जिल्ह्यात सध्या २ हजार रुग्ण होम आयसोलेट आहेत. नियमानुसार या रुग्णांनी घरातच राहणे आवश्यक आहे. कोणाच्याही संपर्कात न येता काळजी घेणे गरजेचे असते; परंतु बहुतांश लोक हे नियम पायदळी तुडवितात, तसेच त्यांच्याकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांना सुविधा देण्यासाठी प्रशासनाकडे मनुष्यबळच उपलब्ध नसल्याचे दिसत आहे. त्यामुळेच हे लोक गाफिल राहात आहेत.
भाजी, वस्तू आदींमधून कोरोना पसरू शकतो, मग त्यांच्या घरातून निघणाऱ्या कचऱ्यातून का नाही पसरणार? असा सवाल उपस्थित होत असून, स्वतंत्र व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.
गृह विलगीकरणातील रुग्ण काळजी घेत नसल्याच्या तक्रारी
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खाटा अपुऱ्या पडत आहेत. त्यातच ज्यांना लक्षणे नाहीत, अशांना गृह विलगीकरणात राहण्याची परवानगी आरोग्य विभाग देत आहे.
घरी गेल्यानंतर या रुग्णांनी वेगळे राहून काळजी घेण्याची गरज आहे; परंतु ते वेगळेही राहत नाहीत आणि एका ठिकाणी बसतही नसल्याचे समोर आले आहे.
काही रुग्ण तर केवळ एक दोन दिवस आयसाेलेट राहतात. त्यानंतर बिनधास्त बाहेर फिरत असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत; परंतु अद्याप एकावरही कारवाई झालेली नाही.
गृह विलगीकरणातील लोकांचा कचरा घेण्याची स्वतंत्र असे कर्मचारी नाहीत; परंतु कंटेनमेंट झोनमधील कचरा स्वतंत्र जमा केला जात आहे. यासाठी काळजीही घेतली जात आहे. मास्क अथवा इतर बायोमेडिकल कचराही स्वतंत्रपणे वेगळा केला जात आहे. नागरिकांनीही होम आयसोलेट असल्यास कचरा वेगळा देण्याची गरज आहे.
- डॉ.उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी.