अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये तू तू-मै मै
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2019 08:22 PM2019-12-27T20:22:04+5:302019-12-27T20:27:03+5:30
येथील ११ वैद्यकीय अधिका-यांनी गुरूवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्याविरोधात उपसंचालकांकडे तक्रार केली होती
बीड : रजेच्या अर्जावरून जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड व वैद्यकीय अधिकारी डॉ. महादेव चिंचोले यांच्यात तू तू-मै मै झाली. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजता घडली. गुरूवारीच चिंचोले यांच्यासह ११ वैद्यकीय अधिका-यांनी तक्रार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच हा प्रकार घडल्याने चर्चेला उधाण आले आहे.
जिल्हा रुग्णालय सध्या वादग्रस्त ठरू पाहात आहे. येथील ११ वैद्यकीय अधिका-यांनी गुरूवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांच्याविरोधात उपसंचालकांकडे तक्रार केली होती. शुक्रवारी पुन्हा वाद झाला. डॉ.राठोड हे आपल्या कक्षात बसलेले होते. डॉ.चिंचोले हे रजेचा अर्ज घेऊन त्यांच्याकडे गेले. याचवेळी त्यांच्यात शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर चिंचोले हे अर्ज टेबलवर ठेवून निघून गेले. या प्रकरणाची आरोग्य विभागात वा-यासारखी माहिती पसरल्याने दिवसभर याची चर्चा होती.
वैद्यकीय अधिका-यांचीही चूक
गुरूवारी तक्रार करणा-या डॉक्टरांपैकी काही डॉक्टर हे शासकीय सेवेत असतानाही खाजगी सेवा देत असल्याचे समोर आलेले आहे. विशेष म्हणजे त्यांनी व्यवसायरोध भत्ताही घेतलेला आहे. याची नोटीस बजावल्यानेच काहींनी राग काढल्याची चर्चा आहे. आता चौकशीतूनच नेमका खरा प्रकार काय? हे समोर येणार आहे.
रजेसाठी अर्ज आला होता. ३० व ३१ डिसेंबरला त्यांची ड्यूटी असल्याने रजा नाकारली. याबाबत लेखी पत्र काढले जाईल. याची उपसंचालकांना माहिती दिली जाणार आहे.
- डॉ.सुखदेव राठोड,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, बीड
रजेसाठी मी अर्ज घेऊन गेलो होते. मला रजा नाही म्हणले. मी नियमानुसारच रजा मागितली होती. रजा नाकारल्याने मी टेबलवर अर्ज ठेवून निघून आलो. रजा न देणे, म्हणजे आमच्यावर अन्याय आहे.
- डॉ.महादेव ंिचंचोले, वैद्यकीय अधिकारी, बीड