वाद विकोपाला गेला अन तरुणाने दोन सख्ख्या भावांचा कुऱ्हाडीचे घाव घालून खातमा केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 01:00 PM2021-05-19T13:00:40+5:302021-05-19T13:07:58+5:30

दोघे भाऊ वडिलांकडे तक्रार करणार असल्याची माहिती मिळाल्याने तरुणाचा संताप अनावर

The dispute escalated and the young man killed two brothers with an ax. | वाद विकोपाला गेला अन तरुणाने दोन सख्ख्या भावांचा कुऱ्हाडीचे घाव घालून खातमा केला

वाद विकोपाला गेला अन तरुणाने दोन सख्ख्या भावांचा कुऱ्हाडीचे घाव घालून खातमा केला

Next
ठळक मुद्देबीड जिल्ह्यात दोन सख्ख्या भावांचा कुऱ्हाडीचे घाव घालून खूनक्षुल्लक कारणावरून वाद विकोपाला, आरोपी फरार

बीड : क्षुल्लक कारणावरून १५ दिवसांपूर्वी झालेल्या वादातून दोघा सख्ख्या भावांवर कुऱ्हाडीने हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना १७ मे रोजी रात्री ११ वाजेदरम्यान बीड तालुक्यातील नागापूर खुर्द येथे घडली.

राम साळुंके (५०) व लक्ष्मण साळुंके (४७) अशी या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. १५ दिवसांपूर्वी गावातील परमेश्वर साळुंके (२३) याच्यासोबत शाब्दिक वाद झाला होता. त्यावेळी हा वाद गावातच मिटवण्यात आला होता; परंतु सोमवारी परमेश्वर याने राम व लक्ष्मण साळुंके या दोघांना फोन करून झालेल्या भांडणाची कुरापत काढत शिवीगाळ केली. त्यानंतर परमेश्वरला समजवण्यासाठी व शिवीगाळ केल्याचे त्याच्या आई-वडिलांना सांगण्यासाठी सोमवारी रात्री अकरा वाजता राम व लक्ष्मण साळुंके त्याच्या घराकडे निघाले होते. दरम्यान, आपल्या घरी ते दोघे येणार असल्याची माहिती परमेश्वरला मिळाली. राम व लक्ष्मण साळुंके यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीने परमेश्वर कुऱ्हाड घेऊन त्याच्या घराकडे येणाऱ्या रस्त्यावर दबा धरून बसला.

राम व लक्ष्मण साळुंके दिसताच परमेश्वर साळुंके याने त्यांच्यावर अचानक कुऱ्हाडीने घाव घातले. या हल्ल्यात दोघेही जागीच गतप्राण झाले. काही प्रत्यक्षदर्शींनी तात्काळ या घटनेची माहिती पिंपळनेर पोलिसांना दिली. तोपर्यंत आरोपी परमेश्वर साळुंके त्या ठिकाणावरून फरार झाला होता. ठाणेप्रमुख सपोनि शरद भुतेकर, पोउपनि ज्ञानेश्वर सानप यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा वाद मिटवण्यासाठी नागापूर खुर्द येथील माजी सरपंच व या प्रकरणातील फिर्यादी विठ्ठल साळुंके यांनादेखील बोलावण्यात आले होते. घटनेचा पंचनामा करून माजी सरपंच व प्रत्यक्षदर्शी विठ्ठल साळुंके यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोउनि ज्ञानेश्वर सानप करत आहेत.

कुटुंब पडले उघड्यावर
राम साळुंके आणि लक्ष्मण साळुंके हे दोघेही शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मुलांचे शिक्षणदेखील सुरू होते. मात्र, क्षुल्लक कारणावरून त्यांच्या मुलांच्या बरोबरीचा असलेल्या आरोपी परमेश्वर याने त्यांचा खून केल्यामुळे कुटुंब उघड्यावर पडले आहे.

अधिकारी रात्रभर ठाण मांडून
या घटनेनंतर उपअधीक्षक संतोष वाळके, सहायक पोलीस निरीक्षक शरद भुतेकर व इतर अधिकारी घटनास्थळावर ठाण मांडून होते. आरोपीच्या शोधासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.

Web Title: The dispute escalated and the young man killed two brothers with an ax.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.