"आम्ही एकाच छताखाली राहतो; पण एकमेकांचे तोंडही पाहत नाहीत"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 11:02 AM2022-03-04T11:02:25+5:302022-03-04T11:03:28+5:30
आमदार संदीप व माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या घरगुती वादावर योगेश क्षीरसागरांकडून खुलासा
- सोमनाथ खताळ
बीड : आम्ही स्व.केशरबाई क्षीरसागर यांचे वारसदार आहोत. आमचे वडील ३५ वर्षे नगराध्यक्ष राहिले; पण कधी कोणाला अपशब्द बोलत नाहीत. आमदारांना कोण मुर्खपणाचा सल्ला देतंय काय माहिती. आम्ही एका घरात, एका छताखाली राहतो; पण एकमेकांचे तोंडही पहात नाही, असे सांगत माजी नगरसेवक डॉ.योगेश क्षीरसागर यांनी आपल्या घरातील वादावर खुलासा केला. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आ.संदीप क्षीरसागर हे राजकीय विरोधक असूनही एकाच छताखाली राहतात तरी कसे? या चर्चेला आता उत्तर मिळाले आहे.
राजकारणात काका-पुतण्या, बहीण-भाऊ, भाऊ-भाऊ असे विरोधक आहेत. बीडमध्ये मुंडे भाऊ-बहिणीच्या आरोप-प्रत्यारोपांची चर्चा राज्यभर होते. आता त्यांच्यापाठोपाठ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व आ.संदीप क्षीरसागर यांचा क्रमांक लागला. विधानसभा निवडणुकीत काका जयदत्त क्षीरसागर यांना पराभूत करून संदीप क्षीरसागरांनी आमदारकीची माळ गळ्यात पाडून घेतली. तेव्हापासून या घरात राजकीय विरोध सुरू झाला. नंतर नगरपालिका निवडणुकीतही आ.संदीप यांनी बाजी मारली; परंतु त्यांना ती टिकवून ठेवता आली नाही. आमदारांचेच काका डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी पाच सदस्यांना आपल्या जाळ्यात ओढून पालिकेवर सत्ता मिळवली. त्यानंतर पालिकेतही वाद सुरू झाले आहे. आता काही दिवसांवर पालिका निवडणुका आल्या आहेत. राज्यात जरी महाविकास आघाडी सरकार असले तरी बीडमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीत बिघाडी आहे. याच बिघाडीतून २५ फेब्रुवारी रोजी मुद्रांक कार्यालयात गोळीबार झाला. यात आमदारांचे वडील व दोन बंधू आणि माजी नगराध्यक्ष व त्यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल झाला.
यामुळे शहरात राजकीय तणाव निर्माण झाला होता. हे कट्टर विरोधक एकाच छताखाली कसे रहात असतील, असा सवाल कार्यकर्त्याच्या मनात होता. याच अनुषंगाने गुरुवारी पत्रकार परिषदेत पत्रकारांनी माजी नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागरांना हा प्रश्न विचारला. यावर त्यांनी या वादावर खुलासा करत आपण एका छताखाली रहात असलो तरी एकमेकांचे तोंडही पाहत नसल्याचे सांगितले. त्यामुळे बाहेर जो राजकीय वाद आहे, तोच घरातही असल्याचेही यानिमित्ताने समोर आले आहे.
लहान मुलांचा असतो वावर
एका छताखाली रहात असलो तरी सुख-दुखा:त एकमेकांच्या सोबत आहोत. सणावाराला लहान मुले, महिलांचे ये-जा होतच असते; परंतु आम्ही कधी एकमेकांना बोलायचे तर लांबच; परंतु तोंडही पाहत नाहीत. कधी येता-जाता क्रॉसिंग होते; पण आम्ही कधीच बोलत नाहीत, असेही डॉ. याेगेश क्षीरसागर यांनी सांगितले.