गाळपास ऊस नेण्यावरून वाद, कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्यास पोलीस अधिकाऱ्यासमोरच मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 05:01 PM2021-12-08T17:01:30+5:302021-12-08T17:03:17+5:30
मारहाण होत असताना दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या सहा पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे या उपस्थित असताना त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप जय महेश कारखान्याच्या कर्मचाऱ्याकडून केला जात आहे.
माजलगाव ( बीड ) : तालुक्यातील जय महेश शुगर इंडस्ट्रीजचे शेतकी अधिकारी यांना दिंद्रुड येथील सहा. पोलीस निरीक्षक यांच्यासमोर मारहाण करण्यात आली. शेतकऱ्याच्या उसाची नोंद उडवल्या प्रकरणी ही मारहाण राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगाभिषण थावरे यांच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसात कसल्याच प्रकारची तक्रार नव्हती.
तालुक्यातील आनंदगाव येथील शेतकरी सत्यप्रेम थावरे यांचा ऊसाची नोंद असतांनाही ऊस जय महेश शुगरकडुन कारखाना घेऊन जात नसल्याच्या अनेक तक्रारी संबंधित शेतकऱ्यांनी केली होती. आपला ऊस जात नसल्यामुळे यांनी बुधवार रोजी आपला उसाचा फड जाळून देऊन त्यात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे कालपासून पोलीस त्याच्या मागावर होते. परंतु तो पोलिसांना सापडला नाही.
बुधवारी सकाळपासूनच यांच्या शेतात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगाभीषण थावरे हेही गेले होते. त्यानंतर त्यांनी शेतकी अधिकारी सुजय पवार यांना बोलावून घेतले. यावेळी थावरे व पवार यांच्यात बाचाबाची झाली. दरम्यान यावेळी याठिकाणी असलेल्या थावरे यांच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी अधिकारी पवार यांना मारहाण केली.
ही मारहाण होत असताना दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या सहा पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे या उपस्थित असताना त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप जय महेश कारखान्याच्या कर्मचाऱ्याकडून केला जात आहे. या मारहाण प्रकरणी दिंद्रुड पोलिसात रात्री उशिरापर्यंत तक्रार दाखल नव्हती.