हरिनाम सप्ताह घेयचा की नाही यावरून राडा; थेट महिला सरपंचाच्या डोक्याला लावली पिस्तूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2022 11:56 AM2022-01-17T11:56:53+5:302022-01-17T12:00:17+5:30
या प्रकरणी ६ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे
गेवराई (जि. बीड) : कोविडची वाढती रुग्णसंख्या व ओमायक्रॉनमुळे आलेले निर्बंध या पार्श्वभूमीवर पारंपरिक पद्धतीने होणारा हरिनाम सप्ताह घ्यायचा किंवा नाही,यासाठीच्या बैठकीतच वाद उफाळून आला. ही घटना तालुक्यातील बोरगाव चकला येेथे १५ जानेवारी रोजी घडली. यावेळी महिला सरपंचाच्या डोक्याला पिस्तूल लावली, या आरोपावरुन सहा जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला.
छबूबाई ज्ञानोबा राख (६७) या बोरगाव चकला गावच्या सरपंच आहेत. हरिनाम सप्ताहबाबत १५ रोजी गावकऱ्यांची बैठक बोलावली होती. दादासाहेब शहादेव राख याने सप्ताह आम्ही घेणार आहोत, असे म्हणत तुम्ही कोण आहात, असे म्हणून सरपंचांचा अवमान केला. यावेळी त्याने शिवीगाळ सुरु केली. छबूबाई यांनी शिवीगाळ का करतो, असे म्हटल्यावर त्याने त्यांच्या दिशेने चप्पल भिरकावली. त्यानंतर डोक्याला गावठी पिस्तूल लावून जीवे मारण्याची धमक्या दिल्या. छबूबाई यांचा पुतण्या प्रवीण याच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. दादासाहेब राखसह शहादेव भानुदास राख, नागेश रामराव राख, रामराव एकनाथ राख, ज्ञानेश्वर किसन राख, उद्धव रघुनाथ खेडकर यांच्यावर चकलांबा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. उपनिरीक्षक दिगंबर पवार तपास करत आहेत.
गावात तणावपूर्ण शांतता
बोरगाव चकला हे गाव राजकीय वादामुळे सतत चर्चेत असते. १५ रोजीच्या घटनेनंतर चकलांबा ठाण्याचे सपोनि भास्कर नवले यांनी गावात भेट देत शांततेचे आवाहन केले. दरम्यान, दुसऱ्या गटाची ही तक्रार असून ती चौकशीवर आहे.